बॉलिवूड कलाकारांसोबत ड्रग्ज पार्टीच्या आरोपांवर करण जोहरने मौन सोडलं

| Updated on: Aug 19, 2019 | 3:07 PM

माझ्या घरात आयोजित केलेल्या पार्टीला इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते. मी तो व्हिडीओ शूट केला. जर तिथे भलतं सलतं काही घडत असतं, तर व्हिडीओ शूट केला असता का?' असा प्रश्न करण जोहरने विचारला आहे

बॉलिवूड कलाकारांसोबत ड्रग्ज पार्टीच्या आरोपांवर करण जोहरने मौन सोडलं
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) घरी आयोजित पार्टीत कलाकारांनी ड्रग्ज (Drug Party) घेतल्याचा आरोप झाल्याच्या दोन आठवड्यानंतर खुद्द करणने मौन सोडलं आहे. ती आम्हा मित्र मंडळींची घरगुती पार्टी होती, विकी कौशल तर नुकताच डेंग्यूतून बरा झाला होता, असं करणने स्पष्ट केलं.

‘ड्रग्जचं सेवन केलं असतं, तर आम्ही व्हिडीओ शेअर केला तरी असता का?’ असा प्रश्न करणने सिनेपत्रकार राजीव मसंद यांच्याशी बोलताना उपस्थित केला. ‘त्या पार्टीला इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते. आठवडाभर काम करुन दमल्यानंतर थोडा मोकळा वेळ घालवण्यासाठी ती पार्टी होती. मी तो व्हिडीओ शूट केला. जर तिथे भलतं सलतं काही घडत असतं, तर व्हिडीओ शूट करण्याइतपत मी मूर्ख आहे का?’ असं करण विचारतो.

‘विकी कौशलने नेमकं त्याच वेळी नाक खाजवल्याने लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढल्या. खरं तर विकीला डेंग्यू झाला होता, आणि तो तेव्हा कुठे बरा होत होता. तो गरम लिंबूपाणी पित होता. काही जण वाईन पित होते. व्हिडीओ काढण्याच्या पाच मिनिटं आधी माझी आई तिथे होती. म्हणजे ही कौटुंबिक-सोशल पार्टी होती. आम्ही गाणी ऐकली, खाल्लं-प्यायलं. गप्पा मारल्या’ असं करण म्हणाला.

‘खरं तर अशा तथ्यहीन आरोपांना उत्तर द्यावंसंही मला वाटत नाही. पण मी उत्तर द्यायचं ठरवलं. पुढच्या वेळी असे निराधार आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार. तुम्हाला काहीतरी वाटलं, म्हणून खऱ्याचा आधार न घेता तुम्ही आमच्या प्रतिमेवर चिखलफेक कराल का?’ असंही करण संतापून विचारतो.

काय झालं होतं?

अकाली शिरोमणी दलचे आमदार मजिंदर सिंह सिरसा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत करण जोहरच्या पार्टीत ड्रग्जचं सेवन होत असल्याचा आरोप केला होता. ‘बॉलिवूडचे गर्विष्ठ तारे नशेची मिजास मिरवताना पाहा’ असं कॅप्शन देत सिरसा यांनी व्हिडिओ शेअर केला होता.

 

या पार्टीला दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, झोया अख्तर अशी स्टार मंडळी उपस्थित असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मजिंदर यांच्या ट्वीटला उत्तर देत ‘माझी पत्नीही या पार्टीमध्ये होती आणि व्हिडीओमध्येही आहे. कोणता स्टार ड्रग्जच्या नशेत नव्हता. खोट्या अफवा पसरवणं बंद करा. तुम्ही माफी मागण्याची हिंमत दाखवाल, अशी अपेक्षा करतो’ असं मिलिंद देवरा म्हणाले होते.