गडचिरोलीत माओवाद्यांचा हैदोस, भरदिवसा अपहरण आणि हत्या

गडचिरोली : नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत आदिवासींच्या हत्येचं सत्र सुरुच आहे. माओवाद्यांकडून पुन्हा एकदा आदिवासी नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वीच एकाची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. बुधवारी दुपारी पुन्हा एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. पोलिसांना माहिती पुरवल्याच्या आरोपावरुन माओवाद्यांकडून हे हत्यांचं सत्र सुरु आहे. गडचिरोलीतील भामरागड तालुक्यतील ताडगाव जंगलात 22 […]

गडचिरोलीत माओवाद्यांचा हैदोस, भरदिवसा अपहरण आणि हत्या
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

गडचिरोली : नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत आदिवासींच्या हत्येचं सत्र सुरुच आहे. माओवाद्यांकडून पुन्हा एकदा आदिवासी नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वीच एकाची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. बुधवारी दुपारी पुन्हा एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. पोलिसांना माहिती पुरवल्याच्या आरोपावरुन माओवाद्यांकडून हे हत्यांचं सत्र सुरु आहे.

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यतील ताडगाव जंगलात 22 एप्रिल 2018 रोजी पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई करत 40 माओवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. पोलिसांच्या सी60 या पथकाने ही कारवाई केली होती. माओवाद्यांच्या अनेक मोठ्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शाबासकी दिली होती. पण माओवाद्यांनी या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आदिवासी नागरिकांच्या हत्येचं सत्र सुरु केलंय.

पोलिसांनी 40 माओवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्यांची दहशत कमी झाल्याचं चित्र होतं. पण दहशत पुन्हा निर्माण करण्यासाठी माओवाद्यांना गावकऱ्यांना लक्ष्य करणं सुरु केलंय. भामरागड आणि एटापल्ली या दोन तालुक्यात माओवाद्यांनी अक्षरशः हैदोस माजवलाय. पोलिसांना या गावकऱ्यांनी माहिती पुरवल्याचा माओवाद्यांना संशय आहे.

21 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता 130 ते 150 माओवाद्यांनी कसनासूर गावात येऊन संपूर्ण गावकऱ्यांना मारहाण केली. रात्री एक वाजता सात आदिवासी ग्रामस्थांचं अपहरण केलं. त्यामुळे संपूर्ण गाव दहशतीत होतं. यानंतर उर्वरित ग्रामस्थांनी ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढली.

दुसऱ्या दिवशी सकाळी कोसफुंडी फाट्याजवळ तीन जणांचे मृतदेह आढळून आले. मालू डोग्गे मडावी, कन्ना रैनू मडावी, लालसू कुडयेटी अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावं आहेत. उर्वरित चौघांपैकी तीन जणांची सुटका करुन दिली आणि पाच दिवसांनी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात 32 वर्षीय युवकाची हत्या केली. बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पेनंगुडा फाट्यावर एका 50 वर्षीय व्यक्तीची माओवाद्यांनी हत्या केली.

माओवाद्यांच्या या हल्ल्यांमुळे गडचिरोलीत दहशतीचं वातावरण तयार झालं. दिवसा बाहेर पडायचीही नागरिकांना भीती वाटायला लागली आहे. 40 माओवाद्यांचा खात्मा केल्यानंतर नागरिकांची भीती काही प्रमाणात दूर झाली होती. पण सध्या या माओवाद्यांना आता पुन्हा एकदा पोलिसी खाक्या दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अजून बळी जाण्याअगोदरच पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी गावकरी करत आहे.