अजितदादांच्या गावात बिबट्याची दहशत, मेंढयांच्या कळपावर हल्ला, मेंढपाळ हवालदिल

| Updated on: Jan 21, 2020 | 8:58 PM

गेल्या महिन्यात बारामती एमआयडीसीत वावर असलेल्या बिबट्याने आता बारामती तालुक्यातल्या काटेवाडी, कन्हेरी परिसरातही दहशत माजवली. या बिबट्याने सोमवारी (21 जानेवारी) सायंकाळी मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला.

अजितदादांच्या गावात बिबट्याची दहशत, मेंढयांच्या कळपावर हल्ला, मेंढपाळ हवालदिल
Follow us on

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गावात म्हणजेच बारामतीत सध्या बिबट्याने दहशत माजवली आहे. गेल्या महिन्यात बारामती एमआयडीसीत वावर असलेल्या बिबट्याने आता बारामती तालुक्यातल्या काटेवाडी, कन्हेरी परिसरातही दहशत माजवली. या बिबट्याने सोमवारी (21 जानेवारी) सायंकाळी मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला. यावेळी मेंढपाळाने प्रसंगावधान राखून या बिबट्याला पळवून लावल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

काटेवाडी गावातील धनेवस्ती इथे सोमवारी मेंढ्याचे कळप चरत असताना अचानक एका मेंढीवर बिबट्याने हल्ला चढवला. या मेंढीला जबड्यात धरून या बिबट्याने जवळपास तीन ते चार एकर शेतातून फरफटत नेलं. त्याठिकाणी असलेल्या मेंढपाळ महादेव काळे यांनी प्रसंगावधान राखत या बिबट्याचा पाठलाग केला. त्याला काठीने हुसकावून लावलं. त्यामुळे बिबट्याने मेंढीला सोडून शेजारीच असलेल्या उसाच्या शेतात पळ काढला. या सर्व प्रकारामुळे मेंढपाळांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या हल्ल्यात एक मेंढी जखमी झाली आहे. एका मेंढीला गंभीररीत्या जखम झाल्यामुळे मेंढपाळांना दु:ख अनावर झालं आहे. आम्ही सर्व मेंढपाळ या परिसरात आपल्या मेंढ्यांना चरायला आणतो. मात्र, आता बिबट्याच्या वावर असल्यामुळे आम्ही चिंतेत आहोत, असं मेंढपाळ आनंदा केसकर सांगतात.

धनेवस्ती येथील विजय काटे यांच्या शेतात मेंढ्या चरत असताना हा प्रकार घडला. त्यानंतर याबद्दल वनविभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असून इतर उपाययोजनाही केल्या आहेत.

Leopard attack on a flock of sheep