राज्यात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?

| Updated on: Mar 22, 2020 | 4:46 PM

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगभरातील 140 पेक्षा अधिक देशात या विषाणूने शिरकाव केला (Maharashtra lock down due to corona) आहे.

राज्यात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?
Follow us on

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगभरातील 140 पेक्षा अधिक देशात या विषाणूने शिरकाव केला (Maharashtra lock down due to corona) आहे. तसेच अडीच लाखांहून अनेकांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारनेही 31 मार्चपर्यंत देशभरातील सर्व रेल्वे गाड्या आणि वाहतूक सेवा बंद केली आहे. त्यासोबत राज्य सरकारनेही महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू होणार असल्याचे जाहीर केले आणि मुंबईसह राज्यातील रेल्वे वाहतूक आणि लोकल ट्रेनही 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासोबत शहरातील खासगी बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊन दरम्यान राज्यात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील तर बाकी सर्व बंद राहील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात कुठे काय सुरु?

राज्यात 31 मार्चपर्यंत खासगी ऑफिस आणि दुकानं बंद राहणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सरकारकडून इतर सर्व अनावश्यक गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुठे काय बंद राहणार?

संपूर्ण देशात राज्यासह 31 मार्चपर्यंत मालगाडी वगळता संपूर्ण रेल्वे सेवा बंद राहणार आहे. त्यासोबत मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेनही बंद करण्यात येणार आहे. तसेच एसटी बस आणि खासगी बसेसही बंद करण्यात येणार आहे. खासगी कंपन्या आणि अत्यावश्यक दुकानं सोडून इतर सर्व दुकांन बंद राहणार आहेत, असं राज्य सरकारने सांगितले.

दरम्यान, देशभरात कोरोना विषाणू तिसऱ्या स्टेजमध्ये पसरु नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने मोठे निर्णय घेतले आहे. त्यामुळे पुढील 31 मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन राहणार आहे.