मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….

| Updated on: Feb 23, 2021 | 7:46 PM

"पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली", अशी भूमिका संजय राठोड यांनी मांडली (Minister Sanjay Rathore on CM Uddhav Thackeray order about Poharadevi crowd).

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात....
संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

यवतमाळ : शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी वाशिमधील पोहरादेवी गडावर जाऊन जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर तब्बल 16 दिवसांनी राठोड माध्यमांसमोर आले. त्यांनी पोहरादेवी येथे जावून सर्व समाधींची आणि देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर होम हवनमध्येही ते सहभागी झाले. यावेळी पोहरादेवी गडावर त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती. यावरुन विरोधकांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात होता. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशांवर स्वत: संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली (Minister Sanjay Rathore on CM Uddhav Thackeray order about Poharadevi crowd).

संजय राठोड नेमकं काय म्हणाले?

“पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली. आजूबाजूच्या शहरातील लोकं तिथं आली. मुख्यमंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे. मी सुद्धा सर्वांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा असं सांगितलं होतं. पण दहा दिवसांनंतर मी त्यांच्यात गेलो होतो. या दहा दिवसात ज्याप्रकारे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये प्रचार झाला होता त्यामुळे स्वत:हून लोकं त्याठिकाणी आले. गर्दीबाबत लोकांना आवाहन केलं होतं. माझं काम सुरु आहे. मी दर्शन करुन आलो आणि जिल्ह्याची आढावा बैठक घेतली”, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली (Minister Sanjay Rathore on CM Uddhav Thackeray order about Poharadevi crowd).

पोहरादेवी गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.