
Mumba Rain Update : मुंबई तसेच उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा मुंबईच्या लोकलवरही परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार या अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर लोकल तब्बल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. सीएसएमटी ते कर्जतकडे जाणारी लोकलही उशिराने धावत आहेत. एकंदरीत अवकाळी पासामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते जोरदार वारा आणि पावसामुळे ओव्हरहेड वायर्स ट्रीपिंगच्या समस्या उद्भवत आहेत. यामुळे हार्बर लाईन 5-7 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे.
एकीकडे पावसामुळे लोकल उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे ठाणे ते वाशी हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड पाहायला मिळाला. या बिघाडामुळे ठाणे-वाशी हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. रात्री रात्रीच्या नऊ ते दहाच्या दरम्यान तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर आता ही रेल्वेसेवा पूर्वपदावर आली आहे.
अवकाळी पासवाचा फटका अंबरनाथ शहराला बसला आहे. अंबरनाथला अवकाळी पावसाची सुरुवात होताच सर्वत्र सोसाट्याचा वारा अन धुळीचं वादळ निर्माण झालं. त्यामुळे अंबरनाथ शहरात बत्ती गुल झाली. येथे काही काळासाठी वीज गेली होती.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाने हजेरी लावली. जून महिन्याआधीच ठाण्यात पावसाने येथे हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण ठाणेकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र या पावसामुळे ठाणेकरांची काही काळासाठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. आता पडलेल्या पावसामुळे तापमानात घट होणार आहे.
कल्याणमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. येथे जोरदार पासवामुळे एक झाड रिक्षावर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अवकाळी पासामुळे घराकडे परतणाऱ्या चाकरमाण्यांची तारांबळ उडाली. तर याच पावसामुळे येथे काही काळासाठी वीज गेली होती.