
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानातील मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचा पहिला टप्पा गेल्या आठवड्यात पूर्ण झाला असून यामध्ये महापालिका क्षेत्रातील 33 लाखांपेक्षा अधिक घरातील 1 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

तर, आता 15 ते 25 ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेला सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्या दरम्यान जे नागरिक बाहेरगावी होते, त्यांचे सर्वेक्षण दुस-या टप्प्यात होणार आहे. सर्वेक्षणादरम्यान कुटुंबातील सदस्यांची प्राणवायू पातळी व शारीरिक तापमान तपासण्याचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाच्या स्तरावर आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे.

त्याचबरोबर ज्या नागरिकांना सहव्याधी (Co-morbidity) असतील, त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे, तर ज्या नागरिकांना कोविडची लक्षणे असतील, त्यांना महापालिकेच्या दवाखान्यात अथवा रुग्णालयात पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी संदर्भित केले जात आहे.

महापालिका क्षेत्रातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेद्वारे स्वयंसेवकांची पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकाकडून दिवसभरात 75 ते 100 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येते.

‘कोविड 19’ या संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रभावीपणे राबविली जात आहे.