नागझिरा व्याघ्र प्रकल्प सात महिन्यांनंतर सुरु, परवानगी नसताना खासगी वाहनांना प्रवेश, नियम धाब्यावर

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्बल सात महिन्यांनंतर आज सुरु करण्यात आला आहे.

नागझिरा व्याघ्र प्रकल्प सात महिन्यांनंतर सुरु, परवानगी नसताना खासगी वाहनांना प्रवेश, नियम धाब्यावर
| Updated on: Nov 01, 2020 | 11:58 AM

गोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (Nagzira wildlife sanctuary) तब्बल सात महिन्यांनंतर आज सुरु करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा जंगल सफारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ऑफलाईन प्रवेश न मिळाल्याने अनेक पर्यटकांना आल्या पावली निराश होत परत जावे लागले.

या व्याघ्र प्रकल्पात खासगी वाहनांना बंदी असूनही या ठिकाणी खासगी वाहने आत जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी पर्यटकांनी नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला तिथल्या अधिकाऱ्यांनीदेखील याकडे दुर्लक्ष केले आहे. (Nagzira wildlife sanctuary opened after seven months, access to private vehicles without permission)

गोंदिया जिल्ह्यात जंगल सफारीसाठी प्रसिद्ध असलेला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला होता. मात्र सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर हा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी पर्यटकांनी येथे चांगलीच गर्दी केली होती.

पर्यटकांना जंगल सफारी करायची असेल तर त्यांना अगोदरच ऑनलाईन बुकिंग करावे लागते. बुकिंग केलेलं असेल तरच ते पर्यटक जंगल सफारी करू शकतात. जंगल सफारी करताना खासगी वाहनांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. मात्र आज पहिल्याच दिवशी सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक खासगी वाहनांना प्रवेश देण्यात आला, त्यामुळे येथील अधिकऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बऱ्याच विश्रांतीनंतर आज नवेगाव नागझिरा अभयारण्य सुरु झालं असल्याने पर्यटकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहेत, तर खाजगी वाहनांना प्रवेश दिल्याने जिप्सी चालकांची मात्र निराशा झाली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता वाहनाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश दिला जाणार आहे, 10 वर्षांपेक्षा कमी आण 35 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व पर्यटक, गाईड आणि वाहन चालकांना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच वाहनात बसण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. वनक्षेत्रात कोणीही मास्क, हातमोजे, पाण्याची बाटली, खाऊचे पदार्थ आणि त्यांची पाकिटं फेकणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

इतर बातम्या

बिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी

रेल्वेच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू, गोंदिया-चंद्रपूर रेल्वे मार्गावरील घटना

(Nagzira wildlife sanctuary opened after seven months, access to private vehicles without permission)