
कोल्हापूर : महापुराच्या विध्वंसानंतर आता सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पूर्वपदावर येत आहे. पण काहींनी घरातील कर्ता पुरुष गमावलाय, तर काहींचा संसार वाहून गेलाय. हे संसार पुन्हा सावरण्यासाठी नाम फाऊंडेशनने (NAM Foundation) पुढाकार घेतलाय. संस्थेचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला भेट दिली आणि 500 घरं बांधून देणार असल्याचं सांगितलं. ‘नाम’कडून (Nana Patekar) हे काम केलं जाणार आहे.
नाना पाटेकर यांनी शिरोळ भागातील पूरबाधित भागाची पाहणी केली. 100 टक्के जमीनदोस्त झालेली घरे आणि अंशत: पडझड झालेल्या घरासंदर्भात त्यांनी प्रशासनासोबत चर्चा केली. नाम फाऊंडेशनकडून शिरोळ तालुक्यात 500 घरे बांधून दिली जातील, असं नानांनी सांगितलं.
सरकारने रमाई योजना, इंदिरा आवास योजना आणि प्रधानमंत्री घरकूल योजना असेल, याच्या अटी शिथील करून द्याव्यात. तसेच या योजनेद्वारे घरकूलसाठी दिले जाणारे अनुदान, निधी सरकारने अदा करावा. उरलेले पैसे नाम घालेल आणि त्या कुटुंबाला पक्के घर उभे करून देईल, असं नानांनी सांगितलं.
यासंदर्भात, बुधवारी रात्री किंवा गुरुवारीमी नाम फाऊंडेशनच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सर्व विषय मार्गी लावणार आहे. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे. हेच माझे पुण्य आहे, असंही नाना पाटेकर म्हणाले.