नारीशक्तीचा अंगार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन (Vidya Bal passed away) झालं आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. विद्या बाळ या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या.

नारीशक्तीचा अंगार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन
| Edited By: | Updated on: Jan 30, 2020 | 11:01 AM

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन (Vidya Bal passed away) झालं आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. विद्या बाळ या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात आज सकाळी अखेरचा (Vidya Bal passed away) श्वास घेतला. विद्याताईंचं पार्थिव संध्याकाळी 4 वाजेपर्यंत प्रभात रोड येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये विद्याताई सक्रीय होत्या. लेखिका आणि संपादक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. विद्याताईंचं ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक अत्यंत गाजलं.

विद्या बाळ यांना स्त्रियांच्या समस्यांबाबत विशेष आस्था होती. 1981 मध्ये त्यांनी ‘नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रुपांतरित कादंबरी लिहिली आहे.

1982 मध्ये दोन स्त्रियांचे खून झाले. त्यावेळी विद्या बाळ यांच्या ’नारी समता मंच’ या संघटनेने गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचं प्रदर्शन भरवले होतं. या प्रदर्शनाने अख्खा महाराष्ट्रच ढवळून निघाला. स्त्रियांना बोलण्यासाठी काही जागा हवी. म्हणून मग विद्या बाळ यांच्या संघटनेने ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती. त्यातून 2008 मध्ये  ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू केले. (संदर्भ विकीपीडिया)

विद्या बाळ यांचा जन्म 12 जानेवारी 1937 रोजी झाला. त्यांनी 1958 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रातील आणि भारतातील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

विद्या बाळ यांनी पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून दोन वर्षे काम केलं. त्यानंतर, 1964 ते 1983 या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि 1983 ते 1986 या काळात मुख्य संपादक.  त्यानंतर त्यांनी ऑगस्ट 1989 मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरु केले.

विद्या बाळ यांचे प्रकाशित साहित्य

कादंबरी

  • तेजस्विनी
  • वाळवंटातील वाट

अनुवादित कांदबरी

  • जीवन हे असं आहे
  • रात्र अर्ध्या चंचाची

चरित्र

  • कमलाकी (डॉ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र)

स्फुट लेखांचे संकलन

  • अपराजितांचे निःश्वास (संपादित)
  • कथा गौरीची (सहलेखिका – गीताली वि.मं. आणि वंदना भागवत)
  • डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
  • तुमच्या माझ्यासाठी
  • मिळवतीची पोतडी (संपादित, सहसंपादिका मेधा राजहंस)
  • शोध स्वतःचा
  • संवाद
  • साकव

विद्या बाळ यांच्या मार्गदशनाखाली, पुण्यात स्थापन झालेल्या संस्था आणि केंद्रे

  • नारी समता मंच
  • मिळून साऱ्या जणीं
  • अक्षरस्पर्श ग्रंथालय
  • साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ
  • पुरुष उवाच अभ्यासवर्ग
  • पुरुष संवाद केंद्र

विद्या बाळ यांना मिळालेले पुरस्कार

  • आगरकर पत्रकारिता पुरस्कार
  • कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार
  • कै. शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
  • सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’
  • स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता यांबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार