अवनी वाघिणीला शनिवारीच मारलं, बछड्यालाही शनिवारीच पकडलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

यवतमाळ : नरभक्षक टी वन वाघिणीच्या दोन बछड्यांपैकी एका मादी बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलंय. वाघिणीचे सी-1 आणि सी-2 नामक दोन बछडे आहेत. त्यातील मादी सी-2 बछड्याला जेरबंद करण्यात यश आलंय. वनविभागाच्या पथकाने आज या बछड्याला नागपूर येथील पेंच अभयारण्य  येथे पाठविले आहे आणि दुसऱ्या बछड्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. टी […]

अवनी वाघिणीला शनिवारीच मारलं, बछड्यालाही शनिवारीच पकडलं!
Follow us on

यवतमाळ : नरभक्षक टी वन वाघिणीच्या दोन बछड्यांपैकी एका मादी बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आलंय. वाघिणीचे सी-1 आणि सी-2 नामक दोन बछडे आहेत. त्यातील मादी सी-2 बछड्याला जेरबंद करण्यात यश आलंय. वनविभागाच्या पथकाने आज या बछड्याला नागपूर येथील पेंच अभयारण्य  येथे पाठविले आहे आणि दुसऱ्या बछड्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

टी वन म्हणजेच अवनीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. सी-2 या मादी बछड्याला जेरबंद केल्याने या मोहिमेला यश आलं. ही मोहिम अंजी परिसरात सकाळी 5 वाजेपासून सुरू झाली होती. या बछड्यांचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यातील शिवा, पवनपुत्र, चंचलकली, हिमालय या चार हत्तींनाही आणण्यात आलंय.

या हत्तींसह सहा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पथके या मोहिमेत सहभागी झाले आहेत. अवनीच्या बछड्यांना पकडण्यासाठी तारकुंपण असलेल्या 80 एकर अंजी वनक्षेत्र परिसरात वनअधिकारी आणि कर्मचारी वगळता कुणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली. या दोन्ही बछड्यांना पकडण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत डेडलाईन सुद्धा आखण्यात आली होती.

बछड्यांना पकडताना कशी घेतली काळजी?

अवनीच्या दोन्ही बछड्यांना प्रथमता स्वतः शिकार करण्यासाठी सक्षम करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. यासाठी 2 नोव्हेंबरपासून यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत होतं. या बछड्यांनी जंगलामध्ये दोन ते तीन शिकार केल्याचं आढळून आलं. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत त्यांना पकडण्यासाठी एक डेडलाईन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून ठेवण्यात आली होती.

मध्य प्रदेशातून आणलेल्या 4 हत्तींवरून 5 ते 6 व्हेटर्नरी डॉक्टरांच्या 2 पथकांकडून बछड्यांचा शोध घेण्यात येत होता. मात्र या भागातील झुडपी जंगलामुळे या बछड्यांना पकडण्यात यश येत नव्हतं. अखेर आज सकाळी 5 वाजल्यापासून टीम बिट 655 मध्ये गेले आणि या दोन बछड्या पैकी एक मादी बछड्याला पकडण्यात यश आलं.

या ठिकाणी  300 कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा या ऑपरेशनमध्ये कार्यरत होता. सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. शिवाय बिट 655 मध्ये आजूबाजूला 3 किमीपर्यंत वाहतूक आणि येण्या-जाण्यास बंदी करण्यात आली. अत्यंत गोपनीयता ठेवत आज या बछड्याला पकडण्यात आलं. दुसऱ्या म्हणजेच सी-1 बछड्यालाही लवकरच जेरबंद करण्यात येईल असं, वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

शनिवार अवनी आणि बछड्यासाठी घातवार

13 लोकांचा बळी घेणाऱ्या टी वन म्हणजे अवनी वाघिणीला 2 नोव्हेंबरच्या रात्री ठार करण्यात आलं. त्यादिवशी शनिवार होता. तर या अवनी वाघिणीने ज्या 13 लोकांच्या शिकार केले त्यातील बहुतांश शिकार ही शनिवार या दिवसात केली होती. आज या बछड्याला पकडलं तो दिवसही शनिवार आहे.