इथं जन्मलेल्या मुसलमानांचे पूर्वज हिंदू : पद्मश्री सय्यद भाई

| Updated on: Jan 26, 2020 | 8:26 PM

"माझे पूर्वज हिंदू होते. इथं जन्मलेल्या मुसलमानांचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे ते बाहेरुन कसे आले", असा सवाल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या सय्यद भाई (Padmashree award to sayyad bhai) यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना केला.

इथं जन्मलेल्या मुसलमानांचे पूर्वज हिंदू : पद्मश्री सय्यद भाई
Follow us on

पुणे : “माझे पूर्वज हिंदू होते. इथं जन्मलेल्या मुसलमानांचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे ते बाहेरुन कसे आले”, असा सवाल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेल्या सय्यद भाई (Padmashree award to sayyad bhai) यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना केला. काल (25 जानेवारी) देशातील अनेक दिग्गज अशा व्यक्तिंना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळाचे संस्थापक सय्यद भाई यांनाही पद्मश्री पुरस्काराने (Padmashree award to sayyad bhai) सन्मानित केले.

“सीएएमध्ये मुस्लिमांची वंशपरंपरा पाहिली जाते. पण फक्त मुस्लिमांची नव्हे तर सर्वांची वंशपरंपरा पाहण्याची गरज आहे”, असंही सय्यद भाई म्हणाले.

“केंद्र सरकारनं माझ्या कामाची दखल घेतल्याने मला आनंद वाटला. मी मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळाचा संस्थापक सदस्य आहे. समाजात समान नागरी कायदा झाला पाहिजे, सर्व लग्न नोंदणी पद्धतीनं झाली पाहिजे, यासाठी मी पुढाकार घेतला. पती-पत्नीचे वाद न्यायालयात सोडवावे, पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करायला विरोध हवा, त्याचबरोबर ट्रिपल तलाक रद्द केले हे योग्य असून तलाक देण्यापूर्वी तलाक योग्य की अयोग्य हे न्यायालयानं ठरवावं, महिलांना मुल दत्तक घेण्याचा कायदा असावा, अशी सत्यशोधक मंडळाची भूमिका आहे”, असंही सय्यद भाईंनी सांगितले.

“ट्रिपल तलाकाबाबत हुसेन दलवाई यांच्याबरोबर राज्यभरात आम्ही प्रचार केला. त्यावेळी समाजात ट्रिपल तलाकाचा धार्मिक कायदा असल्यानं बदलता येणार नसल्याची भूमिका होती. मात्र आम्हीही महिलांवर अन्याय होत असल्याची भूमिका घेऊन पुण्याला परिषद घेतली होती. मात्र काही संघटनांनी याला विरोध ही केला”, असं सय्यद भाई म्हणाले.

“गोमांसच्या नावानं एक वेगळी इमेज तयार करणं हे घातक असून देशाची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही लोक काही तरी खुसपट काढतात मात्र तो डाग लागला जात असून हाणामाऱ्या होतात. देशात असंतोषाचे वातावरण तयार होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. मुसलमान देशाचे नागरिक असून ते भूमीपुत्र आहेत. राष्ट्रवादासाठी ते कुठे कमी पडणार नाही”, असं सय्यद भाईंनी म्हटले.

“जम्मू-काश्मीरमधील आर्टिकल 370 हटवणे योग्यच आहे. समाजाला विश्वासात घेऊन कायदे बदलले पाहिजेत. समाजिक कायदे हे धर्माशी जोडू नये ते धर्मनिरपेक्ष असले पाहिजे”, असंही सय्यद भाई यांनी म्हटले.