काका आणि पुतण्या एकत्र येणार ? पिंपरीतल्या बैठकीत काय होणार याकडे लक्ष
एकीकडे दोन ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार हे काका आणि पुतण्या एकत्र येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेली काही दिवस राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच कालच ठाकरे घराण्याचे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चुलत बंधू मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा सुरु असतानाच रोहित पवार आणि अमोल कोल्हे हे शरद पवार गटाचे दोन्ही नेत्यांची अजितदादांसोबत पिंपरीत बैठक सुरु असल्याने याबैठकीत काय होते याकडे लक्ष लागले आहे.
राज्यात सध्या वेगळी समीकरणे घडत आहेत.मुंबईत उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महानगर पालिका महत्वाची आहे. तर राज ठाकरे यांचा पक्ष गेली अनेक वर्षे कोणताही करिष्मा दाखवू शकलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मुंबई महानगर पालिकेसह ठाणे, नाशिक, पुणे अशा काही महानगर पालिका युती करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन गटात देखील मनोमिलन होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. आज शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी अजितदादांची भेट घेतली आहे. त्याआधी या दोन्ही नेत्यांनी दादांच्या पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यामध्ये तासभर चर्चा सुरु आहे.
महाविकास आघाडीत फूट
पुणे आणि पिंपरी – चिंचवड या दोन्ही शहरातील महापालिका राष्ट्रवादीच्या दोन्ही गटासाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही महानगर पालिकात शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यायचे ठरवले आहे.या संदर्भात कोणी किती जागा लढायच्या आणि कोणत्या चिन्हावर किती जणांनी लढायचे यावर सल्लामसलत सुरु आहे.आज दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. दरम्यान,पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे.
उद्या सकाळी निर्णय होणार
दोन्ही राष्ट्रवादींनी जागा संदर्भात बैठक जरी सुरु केली असली तरी या बैठकीचा वृत्तांत शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पाठवला जाणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी या संदर्भात पक्षाचा युती संदर्भातील निर्णय जाहीर केला जाणार आहे. अमोल कोल्हे यांनी या बैठकीला आले असताना पत्रकारांशी बोलताना राजकारणात काहीही होऊ शकते अशी प्रतिक्रीया दिलेली आहे. त्यामुळे या बैठकीत काय होते ? हे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का ? की पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका पुरती ही युती होणार याकडे लक्ष लागले आहे.
