Janta Curfew : जनता कर्फ्यू; कोरोना विरुद्ध आज सर्वात मोठी लढाई

| Updated on: Mar 22, 2020 | 7:01 AM

कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (Janta Curfew Live) लागू करण्यात आला आहे.

Janta Curfew : जनता कर्फ्यू; कोरोना विरुद्ध आज सर्वात मोठी लढाई
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू (Janta Curfew Live) म्हणजे एकप्रकारची संचारबदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्री मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना टाळं असणार आहे (Janta Curfew Live).

देशातील सर्व पॅसेंजर, एक्सप्रेस गाड्या, मुंबईतील मोनो आणि मेट्रोही बंद

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व पॅसेंजर ट्रेन काल रात्री (21 मार्च) रात्री 11 वाजेपासून बंद करण्यात आल्या आहेत. मेल, एक्सप्रेस आणि इंटरसिटी पहाटे 4 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. या गाड्या आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद असणार आहेत. याशिवाय मुंबईची लाइफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेनच्याही आज फक्त 1100 फेऱ्या असणार आहेत. विशेष म्हणजे या फेऱ्या फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांसाठी चालू राहणार आहेत. तसेच मुंबईतील मोनो आणि मेट्रो रेल्वे सेवाही आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

एसटीच्या बसेसही रद्द

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या बसेस डेपोतच असणार आहे. पुण्यातील स्वारगेट शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनच्या साधारण हजार गाड्या आज रस्त्यावर धावणार नाहीत. सध्या स्वारगेट आणि शिवाजीनगरच्या 50% फेऱ्या घटवल्या आहेत. यात नियमित 2600 फेऱ्यांपैकी फक्त 700 फेऱ्या होणार आहे. जर प्रवाशांची मागणी वाढली तर बस सोडल्या जाणार आहेत.

‘या’ लोकांना बाहेर पडण्यास परवानगी

जनता कर्फ्यूदरम्यान कोणत्याही नागरिकाला घरातून बाहेर पडता येणार नाही. सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान कोणताही नागरिक सोसायटी किंवा पार्कमध्ये फिरु शकणार नाही. मात्र जर कोणतीही अत्यावश्यक परिस्थिती उद्भवली तर तुम्ही घराबाहेर पडू शकता. यादरम्यान कोणत्याही रुग्णालयात जाणाऱ्या व्यक्तीला थांबवण्यात येणार नाही.

जनता कर्फ्यूदरम्यान पोलीस, मीडिया, डॉक्टर, साफ-सफाई कर्मचारी या लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. या व्यक्तींना पंतप्रधान मोदींनी घराबाहेर पडण्यास परवानगी दिली आहे.

मुंबईत काय सुरु राहणार?

  1. सरकारी आणि खासगी रुग्णालय
  2. औषधं दुकाने
  3. किराणा दुकाने
  4. दूध डेअरी
  5. सरकारी कार्यालय (फक्त 25 टक्के कर्मचारी )
  6. रेल्वे, बेस्ट बस

मुंबईत ‘या’ सुविधा बंद?

  1. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मार्केट बंद
  2. मोठे मॉल बंद
  3. जिम , जलतरण तलाव
  4. सिनेमागृह
  5. मुंबई पुणे ट्रॅव्हल बंद
  6. खासगी कम्पन्या बंद
  7. शाळा कॉलेज
  8. मोठ्या चौपट्या बंद
  9. उद्यान बंद
  10. लग्नाचे हॉल काही प्रमाणात बंद
  11. मच्छीमार्केट बंद
  12. मुंबईतील छोटी मोठी मंदिरे बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (19 मार्च) रात्री आठ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आज संपूर्ण देशभरात (Janta Curfew Live) जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे.

संबंधित बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे