राहुल गांधी नावाच्या तरुणाची पंचाईत, सिम कार्डही मिळेना, बँक कर्जही देईना

| Updated on: Jul 30, 2019 | 5:54 PM

गांधी कुटुंब हे भारतीय राजकारणातील सर्वाधिक चर्चेतील घराणं आहे. त्यातील सदस्यांचीही या ना त्या कारणाने तेवढीच चर्चा सुरु असते. त्यातीलच एक सदस्य असलेल्या राहुल गांधींचीही सध्या अशीच चर्चा सुरु आहे. यावेळीच्या चर्चेमागे कारणही असंच गमतीशीर आहे.

राहुल गांधी नावाच्या तरुणाची पंचाईत, सिम कार्डही मिळेना, बँक कर्जही देईना
Follow us on

इंदूर : गांधी कुटुंब हे भारतीय राजकारणातील सर्वाधिक चर्चेतील घराणं आहे. त्यातील सदस्यांचीही या ना त्या कारणाने तेवढीच चर्चा सुरु असते. त्यातीलच एक सदस्य असलेल्या राहुल गांधींचीही सध्या अशीच चर्चा सुरु आहे. यावेळीच्या चर्चेमागे कारणही असंच गमतीशीर आहे. मध्यप्रदेशमधील इंदूर येथे एका सामान्य गांधी कुटंबाने आपल्या मुलाचे नाव राहुल ठेवले आणि या तरुणाला नामसाधर्म्याचा उपयोग होण्याऐवजी मनस्तापच सुरु झाला.

मध्यप्रदेशच्या इंदूर येथील या तरुणाचे नाव राहुल गांधी असल्याने त्याला अनेकजण गांभीर्याने घेत नसल्याची त्याची तक्रार आहे. या नावामुळे त्याला कंपनीने सिमकार्ड देण्यास, तर बँकेने कर्ज देण्यास नकार दिला.

वडिलांच्या मित्रांच्या चुकीची शिक्षा मुलाला?

23 वर्षीय राहुलच्या वडिलांचे नाव राजेश गांधी आहे. त्यांचं एक कपड्याचं दुकान आहे. याआधी राजेश गांधी बीएसएफमध्ये (BSF) होते. त्यावेळी राजेश यांचे मित्र त्यांना गांधी म्हणत. त्यामुळेच वडिलांनी आपले जुने आडनाव बदलून गांधी आडनाव करुन घेतले. पुढे राहुलला शाळेत दाखल करतानाही हेच आडनाव देण्यात आले, अशी माहिती राहुलने दिली.

सीमकार्डही छोट्या भावाच्या नावेच घेण्याची नामुष्की

या तरुणाला त्याच्या राहुल गांधी नावामुळे बालपणी विशेष अडचणी आल्या नाहीत. मात्र, आता त्याची खिल्ली उडवली जात असल्याची त्याची तक्रार आहे. राहुल इंदूरमधील अखंडनगर येथे राहतो. तेथे त्याने सीम कार्ड घेण्यासाठी अर्ज केला. मात्र, सिमकार्ड कंपनीने राहुल गांधी या नावाची पडताळणी करण्यासच नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने राहुलला आपल्या छोट्या भावाच्या नावे सिमकार्ड घ्यावे लागले. हा प्रश्न इतकाच मर्यादित नाही, तर राहुलच्या नावे कोणतंही बील देखील बनवलं जात नसल्याचा अनुभव इंदूरचा राहुल गांधी घेत आहे.

राहुलचं कर्ज घेऊन कार घेण्याचं स्वप्नही भंगलं

विशेष म्हणजे या राहुल गांधीने कार घेण्यासाठी एका कंपनीकडे कर्जासाठी अर्ज केला. त्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना त्याने आपले नाव राहुल गांधी सांगितले आणि त्याचं सर्व नियोजनच कोलमडलं. राहुलने आपले नाव राहुल गांधी सांगितल्यानंतर संबंधित कंपनीचे कर्मचारी त्याच्यावर हसले आणि राहुल गांधी इंदूरला कधीपासून आले असा प्रश्न केला. काही वेळेतच फोन बंद झाला आणि राहुलचं कर्ज घेऊन कार घेण्याचं स्वप्नही भंगलं.

अखेर गांधी आडनाव बदलण्याचा निर्णय

इंदूरच्या राहुल गांधीला इतक्या अडचणी येत आहेत की अखेर वैतागून तो आपलं आडनावच बदलण्यावर निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबाचे आडनाव गांधी न ठेवता ‘मालवीय’ करण्याच निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने नाव बदलण्यासाठीचा अर्जही केला आहे.