शरद पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेचं फर्मान

पूर्वीचे राज्यकर्ते देवनिष्ठ, धर्मनिष्ठ होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका, असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढलं आहे.

शरद पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, राष्ट्रीय वारकरी परिषदेचं फर्मान

पंढरपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देवाला मानत नाही. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असं फर्मान राष्ट्रीय वारकरी परिषदेने (Rashtriya Warkari Parishad on Sharad Pawar) काढलं आहे.

पूर्वीचे राज्यकर्ते साधना करणारे देवनिष्ठ, धर्मनिष्ठ होते. विनम्र होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करणे किंवा त्यांचे व्याख्यान ठेवून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका, असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढलं आहे.

‘शरद पवार हे रामायणाची आवश्यकता नाही, असं म्हणतात. मुख्यमंत्री असताना पांडुरंगाच्या महापूजेला गैरहजर राहतात. समर्थ रामदास स्वामींचा एकेरी उल्लेख करतात. देव, संत, व्रत, वारी, हिंदू धर्म यांचा अपमान करणाऱ्या, संत तुकाराम वैकुंठास गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली नाही, असं पुस्तक-लेख लिहिणाऱ्या तथाकथित पुरोगामी संघटनांना त्यांचा सातत्याने पाठिंबा असतो.’ असं पत्रकात लिहिलं आहे.

‘हिंदू धर्मसाठी कार्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनाच धार्मिक कार्यासाठी बोलवावे पैशाच्या लालसेपोटी जरी अशा मंडळींना कोणी बोलवत असेल, तरी तो अधर्मच म्हणायचा. राज्यकर्ते देवांना मानत नाहीत, मग आपण त्यांना का मानायचे? असा संतप्त सवाल वक्ते बाबांनी उपस्थित केला’ असा पत्रकात उल्लेख आहे.

निवृत्ती महाराज वक्ते वारकरी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असले तरी ते याबाबत अनभिज्ञ असल्याचा दावा केला जात आहे. कार्यवाह बापू महाराज रावकरांनी हे पत्रक काढल्याची माहिती आहे. मात्र वक्ते बाबांनी सवाल उपस्थित केल्याचा उल्लेख पत्रकात आहे.

Rashtriya Warkari Parishad on Sharad Pawar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI