शरद पवारांनाही भावलेलं डाळिंब उत्पादनातील अग्रेसर गाव!, खानजोडवाडीतील शेतकऱ्यांची यशोगाथा

| Updated on: Nov 13, 2020 | 5:17 PM

सांगली जिल्ह्यातील आटपाडीचा परिसर कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणावरच आपली शेती करावी लागते. त्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळंही इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, पवारांनी भेट दिलेल्या खानजोडवाडीतील शेतकऱ्यांनी पाणी आणि शेतीच्या योग्य नियोजनाच्या जोरावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत

शरद पवारांनाही भावलेलं डाळिंब उत्पादनातील अग्रेसर गाव!, खानजोडवाडीतील शेतकऱ्यांची यशोगाथा
Follow us on

सांगली: शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे टाकणारं पीक म्हणून ऊस, सोयाबीन, कापसाकडे पाहिलं जातं. पण सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी गावातील शेतकऱ्यांनी डाळिंब उत्पादनात मोठं नाव कमावलं आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही या गावाला भेट देण्याचा मोह आवरला नाही. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह शरद पवार यांनी खानजोडवाडीला भेट देत इथल्या डाळिंबाच्या बागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Sharad Pawar’s visit to Khanjodwadi village famous for pomegranate production)

शरद पवार यांनाही ज्या गावाला भेट देण्याचा मोह आवरता आला नाही ते खानजोडवाडी गाव आहे तरी कसं? आणि इथल्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागांचं वैशिष्य काय? हे जाणून घेऊया. सांगली जिल्ह्यातील आटपाडीचा परिसर कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणावरच आपली शेती करावी लागते. त्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळंही इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, पवारांनी भेट दिलेल्या खानजोडवाडीतील शेतकऱ्यांनी पाणी आणि शेतीच्या योग्य नियोजनाच्या जोरावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत. खानजोडवाडी गावात जवळपास 100 शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागेची लागवड केली आहे. दरवर्षी यातील 90 टक्के डाळिंबाची निर्यात केली जाते. शेतीच्या योग्य नियोजनामुळे अवकाळी पावसाचा फटका इथल्या शेतकऱ्यांना फारसा बसला नाही. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी यंदाही निर्यातक्षम डाळिंब पिकवली आहेत.

सततचा दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा आणि तेल्या, बिब्यासारख्या किडीचा सामना करत इथल्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचं भरघोस उत्पादन घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी टेंभू प्रकल्पाचं पाणी आल्यानं इथल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, यंदा कोरोना, लॉकडाऊन आणि अतिवृष्टीसारख्या संकटाचा सामना करत इथला शेतकरी तग धरुन राहिला. त्यातही खानजोडवाडीच्या शेतकऱ्यांनी डाळिंबाचं भरघोस उत्पन्न घेत सर्व स्तरातून कौतुकाची थाप मिळवली आहे.

खानजोडवाडीतील शेतकरी महाराष्ट्रासाठी आदर्श – पवार

खानजोडवाडीतील शेतकरी एकत्र येत डाळिंब शेतीचं नियोजन करत आहेत. हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. अनेक वर्षांपूर्वी फळबागांचा समावेश रोजगार हमी योजनेत करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. जिथं पाऊस आणि पाणी कमी आहे तिथं ऊस लावला की तिथला शेतकरी अडचणीत येतो. त्यामुळे कमी पाणी असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी डाळिंबासारख्या जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे वळायला हवं, असंही पवार यावेळी म्हणाले.

केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी योजनेला, राज्य सरकारला पैसे दिले असतील तर त्याचा उपयोग शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शेड नेट कसं देता येईल, याबाबत विचार केला जाईल. त्याचबरोबर शेती पिकाचं मार्केटिंग प्रभावीपणे कसं करता येईल, यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या:

ऊस लावणार आणि बिल येईपर्यंत कट्ट्यावर बसणार, कसं चालेल?, पवारांचा गावपुढाऱ्यांना टोला

Sharad Pawar | आटपाडी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची शरद पवारांकडून पाहणी

Sharad Pawar’s visit to Khanjodwadi village famous for pomegranate production