ट्रम्प दाम्पत्याला गांधीटोपी, उपरणे, साडी आणि कांदे, नाशिकच्या शेतकऱ्याची कांदा दरासाठी अनोखी शक्कल

| Updated on: Feb 15, 2020 | 11:00 AM

कांद्याला भाव मिळावा आणि अमेरिकेने कांद्याची मागणी करावी, जेणेकरुन भारतातील कांद्याची (Onion for Donald Trump) निर्यातबंदी हटेल, ही त्यामागची भावना आहे.

ट्रम्प दाम्पत्याला गांधीटोपी, उपरणे, साडी आणि कांदे, नाशिकच्या शेतकऱ्याची कांदा दरासाठी अनोखी शक्कल
Follow us on

नाशिक : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतभेटीवर आल्यानंतर कांदे देण्याचा मानस नाशिकच्या शेतकरी दाम्पत्याचा आहे. कांद्याला भाव मिळावा आणि अमेरिकेने कांद्याची मागणी करावी, जेणेकरुन भारतातील कांद्याची (Onion for Donald Trump) निर्यातबंदी हटेल, ही त्यामागची भावना आहे. निफाड तालुक्यातील नैताळे गावातील कांदा उत्पादक (Onion for Donald Trump)  शेतकरी संजय साठे आणि पत्नी शोभा साठे यांनी ही अनोखी आयडीया लढवण्याचं ठरवलं आहे. साठे यांनी यापूर्वी बराक ओबामांची भेट घेतली होती, आता डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची त्यांची इच्छा आहे.

डोनाल्ड टॅम्प आणि त्यांची पत्नी 24 आणि 25 फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहे. साठे दाम्पत्याने स्वागतासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना महाराष्ट्रीयन गांधी टोपी, उपरणे तसेच मेलनिया ट्रम्प यांच्यासाठी साडी आणि कांदे 13 फेब्रुवारी रोजी पाठवले होते, ते आज पोहोच होणार आहे.

यापूर्वी साठे दाम्पत्याने कांद्याच्या दरावरुन गांधीगिरी मार्गाने निषेध केला होता. त्यांनी मातीमोल भावाने विक्री झालेल्या कांद्याच्या विक्रीतून आलेल्या 1064 रुपयांची मनीऑर्डर थेट पंतप्रधान मोदींनी केली होती.

आता ट्रम्प यांनी भारत दौऱ्यात कांद्याची मागणी करावी, जेणेकरुन भारताला कांदा निर्यात करता येईल आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा साठे यांची आहे. त्यामुळेच त्यांनी ट्रम्प यांच्या पत्नीला कांदे भेट देण्याचं ठरवलं आहे.

आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा विक्री होते. या कांद्याची रुचकर, विशिष्ट चव असल्याने संपूर्ण जगात मोठी मागणी असते. यंदा मात्र भारतात कांद्याचे बाजारभाव गगनाला भिडल्याने कांद्याची निर्यातबंदी करण्यात आली. परिणामी भारतात अतिरिक्त कांदा झाल्याने दर पडले. कांद्याचे बाजारभाव 85 टक्क्यांनी घसरल्याने कांदा उत्पादकांना झालेला खर्चही निघणे कठीण झालं आहे.

त्यामुळे त्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादकांनाही भेटण्याची संधी द्यावी अशी विशेष मागणी केली आहे.

त्यासाठी गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत गांधीटोपी, उपरणे, साडी अशा भेटवस्तूंसह स्वतः मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदाही पाठवला. “आपल्या आहारात कांद्याचा उपयोग करून या रुचकर चविष्ट कांद्याचा आस्वाद घ्यावा. तसंच भारत दौऱ्यादरम्यान आपण आमच्या नाशिकच्या कांद्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कराल आणि कांदा उत्पादकांना नक्कीच भेटाल”, अशी अपेक्षा करणारं पत्र साठे यांनी लिहिलं आहे.

नैताळे येथील या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 2010 मध्ये अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबमा यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी जागतिक बदलते तापमान या विषयावर पाच मिनिटं चर्चा झाली होती. यंदा या कांदा उत्पादक शेतकऱ्याने पुन्हा दहा वर्षानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.