यंदा फीवाढ करु नका, मंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश

| Updated on: May 08, 2020 | 4:04 PM

'कोरोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांवर फीवाढीचा बोजा पडू नये, यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. (School Fees will not be raised This Year amid Corona Lockdown)

यंदा फीवाढ करु नका, मंत्री वर्षा गायकवाड यांचे शिक्षण संस्थांना आदेश
Follow us on

मुंबई : 2020-21 शैक्षणिक वर्षात फीवाढ न करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व शिक्षण संस्थांना दिले आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षाची एकूण फी एकरकमी न मागण्याचेही निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. (School Fees will not be raised This Year amid Corona Lockdown)

‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांवर फीवाढीचा बोजा पडू नये, यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशानुसार महाराष्ट्रात यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाची फीवाढ शिक्षण संस्थांना करता येणार नाही.

राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विद्यमान शालेय शिक्षणमंत्र्यांकडे काही दिवसांपूर्वी केली होती.

चालू शैक्षणिक वर्षाची जी फी विद्यार्थ्यांना भरायची आहे, ती एकरकमी भरण्याची सक्ती नसावी, तर टप्पाटप्प्याने (मासिक किंवा त्रैमासिक) भरण्याची सोयही करुन देण्याचे निर्देश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत.

हेही वाचा : राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र

काही शाळा पालकांना फी भरण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र शिक्षण संस्थांनी चालू (2019-20) किंवा आगामी (2020-21) शैक्षणिक वर्षाची शिल्लक किंवा देय वसूल करण्याची सक्ती करु नये. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर फी जमा करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : कॉलेजच्या परीक्षा रद्द, थेट पुढच्या वर्षात प्रवेश, अंतिम सत्राची परीक्षा मात्र होणार

दरम्यान, पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या घोषणेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (School Fees will not be raised This Year amid Corona Lockdown)

पदवीच्या केवळ अंतिम वर्षांचीच परीक्षा होणार आहे असं उदय सामंत यांनी आजच स्पष्ट केलं. बाकी सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे. मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आधी कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा एक ते 31 जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास 20 जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालय बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना याआधीच पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे. मात्र कॉलेज विद्यार्थ्यांवर टांगती तलवार होती.

(School Fees will not be raised This Year amid Corona Lockdown)