कोरेगाव भीमा दंगल हे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र : सूत्र

| Updated on: Jan 24, 2020 | 10:28 AM

कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Bhima Koregaon) यांनी केला आहे.

कोरेगाव भीमा दंगल हे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र : सूत्र
Follow us on

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Bhima Koregaon) यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. पवारांच्या या गंभीर आरोपामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली (Sharad Pawar on Bhima Koregaon) आहे. दैनिक लोकमतने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

“भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला आहे.

“पोलिसांनीही अनेक पुरावे तोडून-मोडून सादर केले आहेत, असाही आरोप पवरांनी पोलिसांवर केला. माझे स्पष्ट मत आहे की तात्कालीन सरकारने पोलिसांसोबत मिळून षडयंत्र रचलेलं होते. तसेच हिंसा केलेल्या मुख्य आरोपींविरोधात गुन्हे दाखल न करता या प्रकरणावरुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला”, असंही पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

“फडणवीस सरकारचे मुख्य उद्देश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबणे आणि लोकशाही आंदोलन अयशस्वी करणे हे होते. तसेच भीम कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्वलोक हे समाजातील सन्मानित नागरिक आहेत”, असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे 200 विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दलित बांधव एकत्रित जमले होते. काही समाज कंटकांकडून भीमा कोरेगाव येथे मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला त्याचे रुपांतर दंगलीत झाले. या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. याच दंगलीबाबत काही गंभीर मुद्दे शरद पवारांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे उपस्थित केले आहेत.