मुलाकडून पित्याची हत्या, मृतदेह घरातच पुरला

पोटच्या मुलाने पित्याची हत्या करुन मृतदेह घरात पुरल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात घडली.

मुलाकडून पित्याची हत्या, मृतदेह घरातच पुरला
| Updated on: Feb 29, 2020 | 11:47 PM

औरंगाबाद : पोटच्या मुलाने पित्याची हत्या करुन मृतदेह घरात (Son Murder Father) पुरल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील जामडी घाट येथे ही घटना घडली. नामदेव चव्हाण (वय 47) असं हत्या झालेल्या पित्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा निलेश आणि आई लताबाई यांना ताब्यात घेतलं आहे.

नामदेव चव्हाण हे गेले दोन ते अडीच महिन्यांपासून बेपत्ता होते (Son Murder Father). त्याप्रकरणी पत्नी लताबाई यांनी कन्नड पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अडीच महिन्यांपासून आपला लहान भाऊ बेपत्ता असल्यानं किसन चव्हाण हे व्याकूळ झाले. त्यांनी नामदेव चव्हाण यांच्या पत्नी लताबाई आणि मुलगा निलेश यांना विश्वासात घेत विचारपूस केली. तेव्हा नामदेव चव्हाण यांची हत्या करुन मृतदेह घरातच पुरल्याची कबुली त्यांनी दिली आणि ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

गेल्या 22 डिसेंबरला रात्री नामदेव चव्हाण हे दारु पिऊन घरी आले. त्यानंतर त्यांच्यात आणि निलेशमध्ये भांडण झाले. त्यामध्येच मानेला काठी लागल्याने नामदेव चव्हाण बेशुद्ध झाले. त्यानंतर निलेशने गळा आवळून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती कोणाला लागू नये म्हणून पत्नी लताबाई आणि मुलगा निलेश यांनी घरातच नामदेव चव्हाण यांचे मृतदेह पुरला.

या घटनेची माहिती कन्नड पोलिसांना कळताच घरात पुरलेला मृतदेह पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी कन्नड पोलिसांनी मुलगा निलेश आणि आई लताबाई यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा गुन्हा दाखल (Son Murder Father) करण्याची प्रक्रिया सुरु आहे.