पूरग्रस्त भागातील जनावरांवर राज्य सरकारतर्फे मोफत उपचार, आर्थिक मदतीचीही घोषणा

| Updated on: Aug 11, 2019 | 11:08 AM

सांगली, कोल्हापूर, साताऱ्यातील पूरग्रस्त भागात वाहून गेलेल्या जनावरांसाठी नुकसानभरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. तसंच या भागातील जनावरांवर मोफत वैद्यकीय उपचारही केले जाणार आहेत.

पूरग्रस्त भागातील जनावरांवर राज्य सरकारतर्फे मोफत उपचार, आर्थिक मदतीचीही घोषणा
Follow us on

मुंबई : सांगली-कोल्हापुरात महापुराचा जोर (Kolhapur Sangli Flood) ओसरत असला, तरी समस्यांचा पूर डोकं वर काढत आहे. पुरात जनावरं वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे. वाहून गेलेल्या मोठ्या जनावराच्या मोबदल्यात 30 हजार रुपये, तर लहान जनावराच्या मोबदल्यात 16 हजार रुपये देण्याची घोषणा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केली.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव, तोकड्या पडणाऱ्या यंत्रणा यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यातच शेतातील पिकं-जनावरं वाहून गेल्यामुळे हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. पाण्यामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

पुरामध्ये वाहून गेलेल्या मोठ्या जनावरासाठी राज्य सरकारतर्फे 30 हजार रुपये, लहान जनावरासाठी 16 हजार रुपये आणि शेळी/ मेंढीसाठी 3 हजार रुपये राज्य शासनातर्फे दिले जाणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली.

केरळमधून पशुवैद्यक राज्यात

राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत 20 डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात काम करत आहे. केरळमधून 10 पशुवैद्यकीय डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत. पूरग्रस्त भागातील सर्व जनावरांवर मोफत उपचारासोबतच औषधं, लसीकरणही विनामोबदला दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री सहायता निधीला 20 लाखांची मदत

महाराष्ट्र मत्स्यद्योग महामंडळ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपयाप्रमाणे 20 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचंही मंत्री महादेव जानकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितलं.

सांगलीतील महापूर ओसरु लागला आहे. दर तासाला एक इंच पाणी पातळी कमी होत आहे. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 54 फूट 6 इंच इतकी असल्याची माहिती आहे.