कोरोना संकटात माजी अधिकाऱ्याने खजाना दाखवला, ठाकरे सरकारला हक्काचे 1 लाख कोटी मिळणार?

| Updated on: May 21, 2020 | 2:04 PM

कोरोना संकटात माजी सनदी अधिकाऱ्याने राज्य सरकारला खजाना दाखवला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला हक्काचे 1 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना संकटात माजी अधिकाऱ्याने खजाना दाखवला, ठाकरे सरकारला हक्काचे 1 लाख कोटी मिळणार?
Follow us on

मुंबई : कोरोना संकटात माजी सनदी अधिकाऱ्याने राज्य सरकारला खजाना दाखवला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला हक्काचे 1 लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. (Thackeray govt may get more than 0ne lakh crore from unspent amount). “राज्यभरात विविध खात्यात वर्षानुवर्षे जो अखर्चिक निधी पडून आहे, तो जवळपास लाख कोटीपेक्षाही जास्त आहे, त्यामुळे तो निधी या कोरोना संकटाच्या काळाता कामी येईल”, असं माजी सनदी अधिकारी राजाराम दिंडे (Rajaram Dinde) यांनी म्हटलं आहे.

दिंडे यांच्या या सल्ल्यानंतर ठाकरे सरकारने तातडीने दखल घेऊन, त्याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. विभाग जिल्हा आणि तालुका स्तरावरील कार्यालयांमध्ये जो निधी वर्षानुवर्षे पडून आहे, तो सरकारकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या संकटात राज्यावरच नाही तर देशावर आर्थिक संकट उभे राहिलं आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने विविध योजनांमध्ये आणि विभागात 30 ते 35 वर्षापासून पडून असलेला अखर्चिक रकमेचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. हा अखर्चिक निधी राज्याच्या क्रीडा संचालनालयात हजार कोटीपेक्षा जास्त पडून असल्याची माहिती, माजी क्रीडा अधिकारी आणि उपसंचालक राजाराम दिंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदिली.

या अखर्चिक निधीचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने 31 मेच्या मुदतीचा अध्यादेश जारी करत, सर्व विभागांना आढावा घेण्यास सांगितलं आहे. हा अखर्चिक निधी राज्यातील सर्व खात्यांमधील तालुका, जिल्हा, विभागीय निमशासकीय कार्यालयाच्या बँकेत सरासरी 1 लाख कोटीपेक्षा जास्त असल्याचे उघड होतं आहे. त्यामुळे कोरोनाच्या आर्थिक संकटात राज्य सरकार अखर्चिक निधीतून मार्ग काढताना दिसत आहे.

मार्च महिन्यात देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन जसजसा वाढू लागला तसे राज्यावरील आर्थिक संकटाचे ढग गडद होत गेले. राज्यातील सर्व कारखाने, उद्योग धंदे, छोटे मोठे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे, येणारा महसूल पूर्णपणे बंद झाला. त्याचबरोबर कोरोनाच्या विरोधात होणाऱ्या उपाययोजनांमध्ये होणारा आर्थिक खर्चही होताच.

राज्य सरकार या सर्व विवंचनेमध्ये असताना माजी सनदी अधिकारी राजाराम दिंडे यांनी सरकारला ट्विट करुन क्रीडा संचनालयातील राज्यातील सर्व जिल्ह्यात अखर्चीक रक्कम अंदाजे एक हजार कोटी रुपये पडून असून, त्याचा तपशील त्या त्या जिल्हा क्रीडा अधिकारी आणि उप संचालक यांच्याकडेही नाही. त्यांच्या पर्सनल बँक खाते, जिल्हा मल्टी गेम बँक खाते, अशा विविध खात्यांमध्ये असून, त्या खात्यांमधील रक्कम 5 ते 25 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे राज्य सरकारांनी या विभागाच्या सर्व बँक खात्याच्या बँक स्टेटमेंटची तातडीने पडताळणी करावी, असं राजाराम दिंडे यांचं म्हणणं आहे.

हे एकाच खात्यातील पडून असलेली अखर्चीक रक्कम आहे. असेच राज्यातील सर्व खात्यांमधील तालुका;जिल्हा ; विभागीय; निम शासकीय कार्यालये यांच्याकडे असाच निधी पडून आहे. तो सरासरी 1 लाख कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे. ही सर्व रक्कम राज्याला एक वर्ष आर्थिक संकटातून बाहेर काढेल, असा विश्वास राजाराम दिंडे यांनी व्यक्त केला.

या ट्विटनंतर राज्य सरकारने याची दखल घेत, तातडीने GR काढून सर्व खात्यातील रक्कम 31 मेपर्यंत सरकारकडे जमा करावी, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितल्याचं राजाराम दिंडे म्हणाले.

(Thackeray govt may get more than 0ne lakh crore from unspent amount)