
1902 सालची गोष्ट. गुजरातच्या वडोदरा येथे कुस्ती स्पर्धा सुरू होती. अनेक कुस्तीपटू आपल्या शक्तीची चुणूक दाखवित होते. पण, आयोजकांनी या स्पर्धेदरम्यान मैदानात एक भला मोठा दगड ठेवला होता. त्या दगडाचे वजन होते तब्बल 1200 किलो. स्पर्धा झाल्यानंतर हा दगड कोण उचलणार याची त्या भल्या मोठ्या मैदानात जमलेल्या प्रेक्षकांना उत्सुकता होती. आलेल्या सर्व पेहलवान प्रयत्न करून थकले. मात्र, कुणालाही तो दगड उचलता आला नाही. प्रत्येकजण इतरांपेक्षा शक्तिशाली होता. पण, तो दगड हलविण्यात कुणालाही यश आले नाही. आयोजक चिंतेत पडले होते. त्याचवेळी एक व्यक्ती पुढे सरसावला. इतर पेहलवान यांच्यापेक्षा उंची जेमतेमच… म्हणजे 5 फुट 7 इंच… त्याला पाहून सगळ्यांन प्रश्न पडला की जिथे भले भले पेहलवान हरले तिथे हा काय करणार? अचानक मैदानात आलेल्या त्या पहेलवानाने त्या दगडाकडे पाहिले. त्याला हात लावला. मग काही वेळातच तो जमिनीवरचा दगड अवघ्या काही क्षणात त्याच्या हा...