तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? उदयनराजे म्हणतात…

अत्यंत लोकप्रिय आणि राजघराण्याचं घराण्याचं वलय असलेले उदयनराजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिळून-मिसळून राहत असतात.

तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? उदयनराजे म्हणतात...


उस्मानाबाद : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज (14 जून) तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी तुळजाभवानी मातेपुढे साकडं घातलं. समर्थक आणि भाविकांच्या अलोट गर्दीत उदयनराजे भोसले तुळजापुरात पोहोचले. त्यांना पाहण्यासाठी तुळजापुरात पहाटे पहाटे प्रचंड गर्दी जमली होती. तुळजाभवानी आईच्या दर्शनानंतर उदयनराजेंनी माध्यमांशीही छोटासा संवाद साधला.

उदयनराजे, तुम्ही मुख्यमंत्री होणार का?

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांवेळी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडून साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं नाव पुढे करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना, यावर स्वत: उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, “मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण आहे. मी त्या पदांना किंमत देत नाही.”

एका वाक्यात उत्तर देऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्रिपदाबाबच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, उदयनराजेंच्या समर्थकांनी वेळोवेळी उदयनराजे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. मोदी लाटेतही उदयनराजेंनी साताऱ्याची जागा राखली होती. अत्यंत लोकप्रिय आणि राजघराण्याचं घराण्याचं वलय असलेले उदयनराजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिळून-मिसळून राहत असतात. राजघराण्यातील असूनही कुठलाही अहंकर किंवा गर्व चेहऱ्यावर वा मनात न बाळगता सगळ्यांमध्य मिसळत असतात. त्यांच्या या दिलदार आणि दिलखुलास स्वभावाची राजकीय वर्तुळासह इतरत्रही चर्चा होत असते.

आपल्या रोखठोक आणि सडेतोड बोलण्याबाबतही उदयनराजेही प्रसिद्ध आहेत. जे पोटात तेच ओठात, असा उदयनराजेंचा स्वभाव आहे. त्यामुळे जे मत असतं, ते कुठलीही आणि कुणाचीही तमा न बाळगा व्यक्त करत असतात.

दरम्यान, उस्मानाबादमधील तुळाजापुरात जाऊन उदयनराजे भोसलेंनी आई तुळजाभवानी देवीसमोर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं साकडं घातलं. यावेळी उदयनराजेंचे समर्थक मोठ्या संख्येत हजर होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI