हैदराबाद एन्काऊंटर : चंबळचे दरोडेखोरही झटपट न्याय द्यायचे, पण… उज्ज्वल निकम

| Updated on: Dec 06, 2019 | 11:44 AM

लोकांना समाधान वाटतं म्हणून पोलिसांच्या कृत्याचं समाधान व्यक्त केलं, तर पोलिस कायदा हातात घेतील, अशी भीती निकम यांनी व्यक्त केली.

हैदराबाद एन्काऊंटर : चंबळचे दरोडेखोरही झटपट न्याय द्यायचे, पण... उज्ज्वल निकम
Follow us on

मुंबई : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी केलेला एन्काउंटर अयोग्य आणि कायद्याला धरुन नव्हता, असं परखड मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. ‘झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. चंबळचे दरोडेखोरही झटपट न्याय द्यायचे, परंतु शेवटी ते दरोडेखोरच होते,’ अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी (Ujjwal Nikam on Hyderabad Rape Accuse Encounter) बोलताना दिली.

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊण्टर करण्यात आला. हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जागीच ठार झाले. बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात उसळलेली संतापाची लाट समाधानात परिवर्तित होताना दिसत आहे.

‘आरोपी पोलिसांकडील बंदूक हिसकावून पळत होते आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं सांगितलं जात आहे. मात्र, यात संशयाला जागा आहे. आरोपींनी पोलिसांची शस्त्रं हिसकावून घेतली, असं घटकाभर गृहित धरलं, तरी प्रश्न पडतो की पोलिस एवढे बेसावध आणि निष्काळजी होते का?’ असा सवाल निकम यांनी व्यक्त केला.

‘प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, तसा पोलिसांनाही आहे. मात्र, हा अधिकार कधी वापरायचा याचेही काही निकष आहेत. एखाद्याचा जीव जात असेल तरच तो समोरच्याचा जीव घेऊ शकतो. या प्रकरणात अद्याप तरी अशा प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही’ असं उज्ज्वल निकम म्हणतात.

सामान्य नागरिक एन्काउंटरबद्दल पोलिसांचं अभिनंदन करत आहेत, समाधान व्यक्त करत आहेत. न्याय झाल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. सामान्य नागरिक म्हणून मलाही तसं वाटू शकतं. मात्र, लोकांना समाधान वाटतं म्हणून पोलिसांच्या कृत्याचं समाधान व्यक्त केलं, तर पोलिस कायदा हातात घेतील, अशी भीती निकम यांनी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टाने एन्काऊंटरच्या बाबतीत काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार न्यायाधीश या खटल्याची संपूर्ण तपासणी करतील. पोलिसांचा गोळीबार हा समर्थनीय होता का, हे तपासतील. तसं नसल्यास पोलिसांवर चौघांच्या हत्येचा आरोप होईल आणि खटला चालेल, असंही निकम यांनी सांगितलं.

BREAKING | हैदराबाद डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर

फास्ट ट्रॅक हे फक्त नावापुरते फास्ट ट्रॅक आहेत. हे सगळं स्लो ट्रॅक असतं. पोलिसांना फायरिंगची ऑर्डर कोणी दिली? हे तपासावं लागेल. आरोपींचा मृत्यू झाल्यामुळे ही केस अॅबेट म्हणजे रद्दबातल झाली आहे, अशी माहितीही उज्ज्वल निकम यांनी दिली.

एन्काउंटरसारख्या प्रकरणांनी लोकांना आनंद होतो कारण न्याय लवकर मिळत नाही, अशी त्यांची भावना झाली आहे. ही न्यायदानाची प्रक्रिया वेगवान व्हावी यासाठी सरकार आणि संबंधित यंत्रणांनी प्रयत्न केले पाहिजेत. अनेक वर्ष खटले चालून शेवटी आरोपी सुटतात अशीही आपल्याकडे परिस्थिती आहे. पुण्यातील विप्रो महिला बलात्कार केस, शक्ती मिल गँगरेप यासारखी अनेक प्रकरणं आपण हाताळली आहेत. त्यामुळे जेव्हा झटपट न्याय मिळतो, तेव्हा लोक त्यांना हिरो मानतात, आणि कायद्यावरचा विश्वास उडतो, अशी प्रतिक्रियाही निकम (Ujjwal Nikam on Hyderabad Rape Accuse Encounter) यांनी दिली.

हैदराबाद पोलिस चारही आरोपींना 5 डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता घटनास्थळी घेऊन गेले होते. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना चौघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिथून जवळच हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर 27 नोव्हेंबरच्या रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनी तिची हत्या करुन मृतदेह पेटवला होता.