लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक, वर्धा पोलिसांनी दिल्लीतून आरोपींना पकडलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

वर्धा : फोन करुन लकी ड्रॉच्या नावावर लोकांकडून पैसे उकडण्याचा गोरखधंदा सध्या जोर धरु लागला आहे. वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने या गोरखधंद्याचा भांडाफोड करत बोगस कॉल सेंटरच्या दोन सूत्रधारांना अटक केली आहे. वर्धा गुन्हे शाखेने दिल्लीतून फसवणूकीचा हा गोरखधंदा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कॉल सेंटरवरुन आधी फोन केला जायचा, तुम्हाला लकी ड्रॉमध्ये एक […]

लकी ड्रॉच्या नावाखाली फसवणूक, वर्धा पोलिसांनी दिल्लीतून आरोपींना पकडलं
Follow us on

वर्धा : फोन करुन लकी ड्रॉच्या नावावर लोकांकडून पैसे उकडण्याचा गोरखधंदा सध्या जोर धरु लागला आहे. वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने या गोरखधंद्याचा भांडाफोड करत बोगस कॉल सेंटरच्या दोन सूत्रधारांना अटक केली आहे. वर्धा गुन्हे शाखेने दिल्लीतून फसवणूकीचा हा गोरखधंदा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कॉल सेंटरवरुन आधी फोन केला जायचा, तुम्हाला लकी ड्रॉमध्ये एक महागडी वस्तू लागली आहे असे सांगण्यात यायचे आणि त्यानंतर वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकडायचे. या आरोपींनी आजवर तब्बल दोन कोटींची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

वर्ध्याच्या हवालदार पुरा येथे राहणाऱ्या वृषभ कैलास करंडे या तरुणाला एक फोन आला होता. लकी ड्रॉमध्ये तुम्हाला फॅशन व्हिला दिल्ली येथील कंपनीत के. टी.एम. गाडी लागली असल्याचं सांगण्यात आलं. सुरवातीला जीएसटी आणि केव्हायसीसाठी काही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर गाडीसाठी रक्कम भरण्यास सांगितलं. गाडीच्या लोभात वृषभने 3 लाख 60 हजार रुपये भरले. पण, गाडी मिळाली नाही. त्याची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती.

त्यानंतर वृषभने राम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा चंग बांधला. संपूर्ण पथक दिल्लीत सात दिवस तळ ठोकून बसलं आणि या बोगस कॉल सेंटरचा शोध घेतला. दिल्लीच्या ओखला इंडस्ट्रीअल क्षेत्रात हे कॉल सेंटर चालवले जात होते. गुन्हे शाखेने येथे धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील 16 कॉम्पुटर, 29 मोबाईल, एक राउटर, 15 चार्जर आणि एक प्रिंटर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.

दिल्लीत पी.आर. एन्टरप्रायजेसच्या नावाने सुरु असलेल्या या कॉल सेंटरचा मालक पंकज जगदीश राठोर आणि मॅनेजर राहुल सृजनसिंग यादव या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना वर्ध्यात आणण्यात आले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 97 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी तब्बल 16 कर्मचारी काम करीत होते. मागील 5 महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरु होता. आतापर्यंत सुमारे 2 कोटी रुपयांची फसवणूक या आरोपींनी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.