हक्कभंग म्हणजे नेमके काय? कोणत्या शिक्षेची तरतूद?

| Updated on: Sep 08, 2020 | 5:45 PM

हक्कभंग म्हणजे नेमके काय? विधिमंडळाच्या सदस्यांना नेमके कोणते विशेष अधिकार असतात? हक्कभंग दाखल झाल्यास पुढे काय होते? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत

हक्कभंग म्हणजे नेमके काय? कोणत्या शिक्षेची तरतूद?
Follow us on

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रनौत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. त्यामुळे हक्कभंग म्हणजे नेमके काय? विधिमंडळाच्या सदस्यांना नेमके कोणते विशेष अधिकार असतात? हक्कभंग दाखल झाल्यास पुढे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे रंजक ठरणार आहे. (What is Infringement breach of privilege motion)

अभिनेत्री कंगना रनौतविरोधात काँग्रेसने विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्तव्यावरुन कंगनाने मुंबईची बदनामी केल्याचे सांगत काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. हक्कभंग समितीच्या अनुपस्थितीत मी स्वत: यावर निर्णय घेईन, असं निंबाळकर यांनी म्हटलं.

दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेनेने विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. विधानसभेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला, तर परिवहन मंत्री अनिल परब, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला अनुमोदन देत चर्चेची मागणी केली.

हक्कभंग कधी होतो?

खासदार आणि आमदार अशा लोक प्रतिनिधींना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने एखाद्या विषयाचा अभ्यास किंवा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात. या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही, आमदार विधानसभेत जे विचार मांडतात त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.

सभागृहाचा हक्कभंग किंवा अवमान झाल्याचा प्रकार सभापतींच्या संमतीने सभागृहाच्या निदर्शनास कसा आणला जाऊ शकतो?

1. विधिमंडळ सभासदाकडून तक्रार
2. विधानसभा सचिवांचा अहवाल
3. याचिका
4. सभागृह समितीचा अहवाल

(What is Infringement breach of privilege motion)

हक्कभंग सिद्ध झाल्यास काय शिक्षा?

विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकारही सभागृहाला असतो. आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. आरोपी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.

आरोपीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावले जाऊ शकते. समज देणे, ताकीद देणे, आरोपी आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे, दंड आकारणे, अटक करुन तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने केलेली आहे.

संबंधित बातम्या :

कंगनाची चौफेर कोंडी, विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, हक्कभंग दाखल करा, सभागृहात शिवसेना आक्रमक

(What is Infringement breach of privilege motion)