महिलेकडून स्वत:च्या हातानेच स्वत:ची प्रसूती, नागपूर शासकीय रुग्णालयातील प्रकार

| Updated on: Jun 03, 2019 | 1:43 PM

नागपूर : रुग्णालयात असूनही महिलेला स्वत: आपल्या हाताने स्वत:ची प्रसूती करावी लागली, नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी (2 जून)ला पहाटे पाचच्या सुमारास प्रसूती कक्षात गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. तिला असह्य प्रसववेदना होत होत्या. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण दुसऱ्या रुग्णाची एक महिला नातेवाईक तिच्या मदतीसाठी धावून आली. मात्र, रुग्णालयातील परिचारीका […]

महिलेकडून स्वत:च्या हातानेच स्वत:ची प्रसूती, नागपूर शासकीय रुग्णालयातील प्रकार
Follow us on

नागपूर : रुग्णालयात असूनही महिलेला स्वत: आपल्या हाताने स्वत:ची प्रसूती करावी लागली, नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी (2 जून)ला पहाटे पाचच्या सुमारास प्रसूती कक्षात गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. तिला असह्य प्रसववेदना होत होत्या. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकूण दुसऱ्या रुग्णाची एक महिला नातेवाईक तिच्या मदतीसाठी धावून आली. मात्र, रुग्णालयातील परिचारीका किंवा डॉक्टरांना जाग आला नाही. दुसऱ्या महिलेच्या मदतीने गरोदर महिलेला स्वत: आपली प्रसूती करावी लागली.

सुकेशनी श्रीकांत चतारे असे या महिलेचे नाव आहे. ती गर्भवती असल्यापासूनच तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुणालयात उपचार सुरु होते. शनिवारी (1 जून) सकाळी तिला रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 33 मध्ये भरती करण्यात आलं. भरती केल्यावर तिला चक्क जमीनीवर झोपवण्यात आलं.

शनिवारी मध्यरात्री तिला प्रसवकळा सुरु झाल्या. तेव्हा डॉक्टर तिला प्रसूती कक्षात घेऊन गेले. मात्र, प्रयत्न करुनही प्रसूती होत नव्हती. त्यामुळे डॉक्टर तिला तिथेच सोडून निघून गेले. ती रात्रभर तिथे एकटीच होती. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास तिला पुन्हा प्रसूतीकळा सुरु झाल्या. त्यावेळी कुठलीही परिचारीका किंवा डॉक्टर नसल्याने तिला स्वत: प्रसूती करावी लागली.

प्रसूती करण्याच्या गडबडीत तिच्या हाताची सलाईन निघाली, त्यामुळे तिचा हात रक्तबंबाळ झाला. सुकेशनीने एका हाताने आपल्या बाळाला पकडले आणि दुसऱ्या जखमी हाताने आईला फोन केला. वार्डात असलेली आई धावत प्रसूती कक्षात आली. आपल्या मुलीला आणि तिच्या बाळाला अशा अवस्थेत बघून सुकेशनीची आई देखील गोंधळली. त्यांनी परिचारीकेला आवाज दिला. त्यानंतर परिचारिका आत आली. तिने बाळाची नाळ कापली. इतकं होऊनही त्या परिचारीकेने बेड नसल्याने सुकेशनीला तिच्या नवजात बाळासह जमिनीवर झोपवले.

हे प्रकरण समजताच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला उद्या सायंकाळपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे, अशी माहिती मेडिकल प्रभारी अधिष्ठाता एन. जी. तिरपुडे यांनी दिली.

या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी. तसेच, रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत रुग्णालयावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी बावनकुळे यांनी स्वत: जाऊन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यानंतर तीन दिवसांत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाकडून नागपूर शासकीय रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहेत.

पाहा व्हिडीओ :