
शरीरातील हाडे, पाणी, स्नायू (Muscle) आणि फॅट या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपले वजन असते. आपण जेव्हा वजन कमी करतो, तेव्हा हे सगळे घटक कमी होऊ शकतात. पण, निरोगी राहण्यासाठी, आपल्याला शरीरातील फॅट म्हणजेच चरबी योग्य प्रमाणात राखणे महत्त्वाचे असते. चरबीमुळे शरीराला ऊर्जा मिळते, थंडीपासून संरक्षण होते आणि जीवनसत्त्वे शोषली जातात. पण हीच चरबी गरजेपेक्षा जास्त झाली, तर ती आरोग्यासाठी वाईट असते आणि अनेक आजारांना आमंत्रण देते.
तुमच्या एकूण कॅलरी गरजेपैकी सुमारे 20 टक्के ते 35 टक्के कॅलरी फॅटमधून मिळणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज 2,000 कॅलरी घेत असाल, तर सुमारे 400 ते 700 कॅलरी फॅटमधून आल्या पाहिजेत. यानुसार 19 ते 50 वयोगटातील पुरुषांसाठी दररोज अंदाजे 60 ते 90 ग्रॅम फॅट असणे गरजेचे आहे. तर 19 ते 50 वयोगटातील महिलांना दररोज अंदाजे 45 ते 75 ग्रॅम फॅट आवश्यक असतात. हे प्रमाण व्यक्तीचे वय, वजन, लिंग आणि शारीरिक श्रमावर अवलंबून बदलू शकते. तर वाईट फॅट जास्त खाल्ल्यास हृदयविकार आणि लठ्ठपणा वाढवते.
हल्ली चिप्स, बर्गर आणि फ्राईज हे जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. ते चवीला चांगले असले तरी त्यामध्ये असलेले फॅट हे वाईट फॅट म्हणजे सॅचुरेटेड आणि ट्रान्स फॅट असतात. हे पदार्थ खूप तेलात तळलेले असल्याने फॅटचे प्रमाण वाढते.
| पदार्थ | प्रमाण | एकूण फॅटचे प्रमाण (साधारण) |
| बर्गर (मध्यम) | 1 पीस | 15 ते 30 ग्रॅम |
| फ्रेंच फ्राईज (मध्यम) | 1 वाटी | 12 ते 20 ग्रॅम |
| पोटॅटो चिप्स | छोटे पॅकेट | 10 ते 15 ग्रॅम |
| पिझ्झा | 1 स्लाइस | 10 ते 15 ग्रॅम |
| डोनट्स | 1 डोनट | 12 ते 20 ग्रॅम |
| आइस्क्रीम | 1 कप | 15 ते 25 ग्रॅम |
| लाल मांस | 100 ग्रॅम | 10 ते 25 ग्रॅम |
| इन्स्टंट नूडल्स | 1 पॅकेट | 10 ते 15 ग्रॅम |
दरम्यान काही जण वजन कमी करण्याच्या नावाखाली फॅटयुक्त पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करतात. तसे अजिबात करु नये. फक्त वाईट फॅट असलेले पदार्थ म्हणजेच जंक फूड, तळलेले पदार्थ खाणे कमी करा. त्याऐवजी, आहारात शेंगदाणे, बिया, चांगल्या तेलाचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन आणि फॅटचे संतुलन योग्य राहील.