
धूम्रपान करणारे अनेकजण असा दावा करतात की सिगारेट ओढल्याने मन शांत होतं आणि ताण कमी होतो. विशेषतः कामाचा ताण वाढला की सिगारेटची संख्या वाढते, असं अनेक ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतं. त्यामुळे धूम्रपान म्हणजे ताणावरचा उपाय अशी एक समजूत तयार झाली आहे. पण खरोखरच सिगारेट ताण कमी करते का? की तो फक्त एक भास आहे? मनाचा भ्रम आहे?
लोकांना सिगारेटमुळे बरं वाटतं, यामागे मुख्य कारण म्हणजे त्यातील निकोटिन. निकोटिन काही सेकंदांत मेंदूपर्यंत पोहोचतं आणि डोपामिनसारख्या ‘फील गुड’ रसायनांच्या स्रावाला चालना देतं. त्यामुळे क्षणभर आनंद किंवा हलकं वाटल्यासारखं जाणवतं. मात्र हा परिणाम तात्पुरता असतो. उलट, निकोटिनची सवय लागल्यानंतर शरीरात त्याची गरज निर्माण होते आणि ती पूर्ण न झाल्यास चिडचिड, अस्वस्थता वाढते. त्यामुळे ताण कमी झाल्यासारखं वाटत असलं तरी प्रत्यक्षात धूम्रपान ताणाचा चक्र अधिक घट्ट करतं.
मानसिक ताण खरोखर कमी होतो?
दिल्ली लंग्स वेलनेस सेंटर येथील डॉ. नेहा वाधेरा सांगतात की, निकोटिनमुळे काही क्षणांसाठी मूड सुधारल्यासारखे वाटू शकते. परंतु हा परिणाम फक्त काही सेकंद ते काही मिनिटांपुरताच मर्यादित असतो. प्रत्यक्षात धूम्रपानामुळे मानसिक ताण कमी होत नाही. उलट, शरीरात निकोटिनची पातळी कमी झाली की बेचैनी, चिडचिड आणि अस्वस्थता वाढू लागते.
डॉ. नेहा यांच्या मते, दीर्घकाळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार खोकला येणे आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका यांचा यात समावेश होतो. अनेक वैज्ञानिक अभ्यासांनी फुफ्फुसांमध्ये होणारी सूज, Chronic Obstructive Pulmonary Disease (COPD) सारखे आजार आणि हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये मजबूत संबंध आढळल्याचे दर्शवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, धूम्रपानामुळे ताण कमी होत नाही तर उलट दीर्घकाळ सवय लागल्यास मानसिक ताण आणखी वाढण्याची शक्यता अधिक असते.
शरीरावर होणारे धूम्रपानाचे दुष्परिणाम
धूम्रपानाचा परिणाम फक्त फुफ्फुसांपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण शरीरावर त्याचा विपरीत प्रभाव पडतो. सिगारेटमधील निकोटिन आणि इतर हानिकारक रसायने शरीरातील विविध अवयवांवर गंभीर परिणाम करतात.
1. श्वसनसंस्थेवर परिणाम : सतत धूम्रपान केल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात. दमा, ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. श्वास घेण्यास त्रास होणे ही सामान्य तक्रार बनू शकते.
2. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम : निकोटिनमुळे रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो
3. रोगप्रतिकारशक्ती कमी होते : धूम्रपानामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वारंवार सर्दी, खोकला किंवा इतर संसर्ग होऊ शकतात
4. त्वचा आणि बाह्यरूपावर परिणाम : त्वचा लवकर सुरकुतते, निस्तेज दिसते. दात पिवळे पडणे आणि तोंडाला दुर्गंधी येणे हेही सामान्य दुष्परिणाम आहेत
5. मानसिक आणि शारीरिक व्यसनाधीनता : निकोटिनची सवय लागल्यामुळे चिडचिड, अस्वस्थता आणि एकाग्रतेत अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे व्यक्ती पुन्हा धूम्रपानाकडे वळते.
धूम्रपानाची सवय कशी सोडावी?
धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी सर्वप्रथम ठाम निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. “मी अमुक तारखेपासून सिगारेट सोडणार” असा स्पष्ट संकल्प करा आणि ती तारीख निश्चित करा. सुरुवातीच्या काळात सिगारेटची इच्छा झाल्यास स्वतःला दुसऱ्या गोष्टीत गुंतवा. चालणे, पाणी पिणे, खोल श्वासोच्छ्वासाचे व्यायाम किंवा च्युइंग गम चघळणे. ताण कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा नियमित व्यायामाची मदत घ्या. मित्र-परिवाराला आपल्या निर्णयाबद्दल सांगा, जेणेकरून त्यांचा पाठिंबा मिळेल. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी किंवा समुपदेशनाची मदतही घेऊ शकता. सातत्य, संयम आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर धूम्रपानाची सवय निश्चितच सोडता येते.