Diwali Skin Care: दिवाळीत पार्लरला जाण्याची गरज नाही! घरच्या घरी मिळवा चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो, ट्राय करा हे फेस पॅक
दिवाळीमध्ये प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर आणि चमकदार दिसावा असे वाटते. यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सऐवजी घरच्या घरी काही सोप्या पदार्थांचा वापर करून फेस पॅक तयार करू शकता. हे फेस पॅक चेहऱ्याला इस्टंट ग्लो देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Homemade Face Pack for Instant Glow: दिवाळीमध्ये प्रत्येकालाच आपला चेहरा सुंदर आणि चमकदार दिसावा असे वाटते. यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सऐवजी घरच्या घरी काही सोप्या पदार्थांचा वापर करून फेस पॅक तयार करू शकता. हे फेस पॅक चेहऱ्याला इस्टंट ग्लो देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
दिवाळी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घरातील साफसफाई, फराळाची तयारी आणि खरेदीची लगबग सुरू असेल. या सगळ्या धावपळीत स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी मात्र अनेकांना वेळ मिळत नाही. दिवाळीच्या दिवशी चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसावा असे वाटत असेल, तर पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांपासून तुम्ही सोपे फेस पॅक तयार करू शकता. इंस्टंट ग्लो मिळवण्यासाठी ३ फेस पॅक कसे बनवायचे आणि वापरायचे, हे जाणून घ्या.
१. बदामचा फेस पॅक
बदाम केवळ आरोग्यासाठीच नाही, तर स्किन केअरसाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. यासाठी काही बदाम घेऊन त्यांची बारीक पावडर तयार करा. त्यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर व्यवस्थित लावा. साधारण १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. बदाम आणि दुधाच्या या मिश्रणामुळे त्वचेला मऊपणा मिळण्यास मदत होते.
२. पपईचा फेस पॅक
पपईमध्ये त्वचेसाठी उपयुक्त एन्झाइम्स असतात. त्यामुळे त्वचेची स्वच्छता करण्यासाठी पपईचा वापर केला जातो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी पपईचा गर एका भांड्यात घेऊन चांगला मॅश करा. त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसते. मात्र, लिंबाच्या रसामुळे काहींच्या त्वचेला जळजळ होऊ शकते, त्यामुळे संवेदनशील त्वचेवर त्याचा वापर टाळा.
३. चंदन पावडरचा फेस पॅक
उन्हामुळे त्वचा निस्तेज झाली असेल किंवा टॅनिंगची समस्या जाणवत असेल, तर चंदन पावडरचा फेस पॅक वापरू शकता. यासाठी एका वाटीत चंदन पावडर घ्या. त्यामध्ये गुलाब पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर व्यवस्थित लावा. पॅक सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. चंदन आणि गुलाब पाण्याच्या या मिश्रणामुळे त्वचेला थंडावा मिळण्यास आणि तजेला दिसण्यास मदत होते.
(डिस्क्लेमरः या लेखातील महिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा कुठलाही दावा करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)