तुम्हालाही ‘या’ समस्या आहेत? चुकूनही कच्चा कांदा खाऊ नका

प्रत्येक आरोग्यदायी गोष्ट प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच असे नाही. अशातच काहीना आरोग्याच्या या काही समस्या असतील तर त्या लोकांनी कच्चा कांद्याचे सेवन करणे टाळावे. चला तर मग जाणून घेऊयात कोणी कच्चा कांदा खाणे टाळावे आणि का?

तुम्हालाही या समस्या आहेत? चुकूनही कच्चा कांदा खाऊ नका
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 5:14 PM

कांदा हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. जेवणात तसेच सॅलडमध्ये कांदा आवडीने खाल्ला जातो. कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. पण तुम्हाला माहित आहे का की कच्चा कांदा खाणे प्रत्येकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर नसतो. कारण काहींना आरोग्य समस्यामुळे कांद्याच्या सेवनाने आजार आणखीन वाढू शकतो. त्यामुळे कोणत्या लोकांनी कांदा खाणे टाळावे हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

कोणी कच्चा कांदा खाऊ नये?

पचनाच्या समस्या असलेल्यांसाठी: वैज्ञानिक संशोधनानुसार, कच्च्या कांद्यामध्ये FODMAPs नावाचे कर्बोदके असतात, जे आतड्यांमध्ये पूर्णपणे पचत नाहीत आणि त्यामुळे पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यांना आधीपासूनच गॅस, पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी कच्चा कांदा खाल्ल्याने या समस्या आणखी वाढू शकतात.

आम्लपित्ताचा त्रास असलेल्या लोकांनी : ज्या लोकांना आम्लपित्त किंवा छातीत जळजळ होते, त्यांनी कच्चा कांदा खाणे टाळावे. आरोग्य तज्ञांच्या मते कच्च्या कांद्यामुळे पोटातील आम्लाची पातळी वाढू शकते, ज्यामुळे ॲसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो. यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि घशात जळजळ यांसारखी लक्षणे वाढू शकतात. ज्यांना आधीपासूनच हे त्रास आहेत त्यांच्यासाठी कच्चा कांदा एक ट्रिगर ठरू शकतो.

ॲलर्जी होत असलेल्या लोकांनी: काही लोकांना कच्च्या कांद्याच्या सेवनाने ॲलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. कच्चा कांदा खाल्ल्यानंतर त्वचेला खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. कांदा खाल्ल्यानंतर एखाद्या व्यक्तीला ही लक्षणे जाणवल्यास, त्यांनी ताबडतोब कांदा खाणे थांबवावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

औषधोपचार घेणारे लोक: कच्च्या कांद्यामध्ये असे घटक असतात जे रक्त पातळ करण्यास मदत करतात. जरी ते सामान्यतः हृदयासाठी फायदेशीर मानले जात, परंतू जे कोणी आधीच रक्त पातळ करणारी औषधे घेत असेल, तर हा परिणाम त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय मोठ्या प्रमाणात कच्चा कांदा खाणे टाळावे.

शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर: शस्त्रक्रियेच्या बाबतीत कच्चा कांदा देखील धोकादायक ठरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल आणि कच्चा कांद्याचे सेवन केल्यास रक्तस्त्रावाचा धोका वाढू शकतो आणि बरे होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us