Ajay Purkar : घाणेरडे चित्रपट बनवायची यांची वृत्ती, अत्यंत फालतू लोक…अनुराग कश्यपला मराठी अभिनेत्याची चपराक; काय घडलं?
Marathi Actor On Anurag Kashyap : मराठी अभिनेत्यानं अनुराग कश्यपवर निशाणा साधला आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली आहे. या निवडीवर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रश्न उपस्थित केले होते. भारताकडून ऑस्करसाठी चुकीच्या चित्रपटांची निवड केली जाते, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत नाराजी व्यक्त होत आहे. अशातच अभिनेता अजय पुरकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे.
अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यामुळे वाद
अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीत भारताच्या ऑस्कर निवड प्रक्रियेवर टीका केली होती. ‘द लंचबॉक्स’ आणि ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ यांसारख्या चित्रपटांची ऑस्करसाठी निवड व्हायला हवी होती, असं त्यांचं म्हणणं होतं. भारतात योग्य चित्रपटांची निवड होत नाही, तसंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाला आधी प्रसिद्धी मिळणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. ‘गोंधळ’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरेसं प्रदर्शन मिळालं आहे का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
अजय पुरकरांची प्रतिक्रिया चर्चेत
अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यावर अभिनेता अजय पुरकर यांनी नाराजी व्यक्त केली. मराठी चित्रपटाला ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड मिळाल्यानंतर त्यावर अशा प्रकारे टीका करणं योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. ‘द मराठी फाऊंडर’ला दिलेल्या मुलाखतीत अजय पुरकर म्हणाले की, ‘अनुराग कश्यप म्हणला की, जरा विचार करायला पाहिजे कुठले पिक्चर दाखवायचे. हे बघ तुझे पिक्चर गेलेच आहेत ना कान्सला, किंवा ऑस्करला जे कुठे जातात ते. एक तर त्याचं एवढं महत्त्व काय हेच मला कळत नाही. माझ्या लोकांनी माझे चित्रपट बघितले हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट पाहिजे. कारण चित्रपट मी माझ्या लोकांसाठी बनवतो. बरोबर. ऑस्करवाल्यांसाठी मी बनवत नाही.’
‘इंडियन ट्रेडिशन दाखवलं की, या लोकांच्या पोटात दुखतं कारण, घाणेरडे चित्रपट बनवायची यांची वृत्ती आहे. हे मी तोंडावर सांगतो, मी कॅमेरामध्ये पण सांगतो. हे अत्यंत फालतू लोक आहेत. असं कसं बोलतोस तू की हा चित्रपट कशाला, गोंधळ सिनेमाची निवड झाली म्हणून मला खूप अभिमान वाटतो.’ असं अजित पुरकर शेवटी म्हणाली.
काय आहे ‘गोंधळ’ चित्रपट?
संतोष दावखर लिखित आणि दिग्दर्शित ‘गोंधळ’ हा मराठी मानसशास्त्रीय थरारपट आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक गोंधळ या लोककलेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा घडते. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी आणि सुरेश विश्वकर्मा यांसारखे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला 99 व्या अकादमी पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडण्यात आलं आहे.
