Rohit Pawar : काल सुनेत्रा काकींची माफी मागितली, आज रोहित पवार बोलले माझी त्यांना विनंती आहे की..
Rohit Pawar : रोहित पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन वाद पेटला आहे. आज रोहित पवार यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे.

“पुण्याला कठोर पालकमंत्री देण्याची गरज आहे. सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम येत नाही” असं मोठं विधान काल रोहित पवार यांनी केलं. त्या विरोधात आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावर आज रोहित पवारांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर ते बोलले. “एखाद्या व्यक्ती त्या पदावर बसलेला असतो, तो पुरुष आहे की महिला हे महत्वाचं नाही. त्या पदावर बसल्यानंतर जी भूमिका घ्यायला पाहिजे, त्या पदाच्या माध्यमातून आपण सामान्य माणसाला न्याय देत असतो. मी काकींच्या बाबतीत बोललो, त्याचं त्यांना वाईट वाटलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो” असं रोहित पवार म्हणाले. काल सुद्धा रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. “मी ते काकींच्या बाबतीत बोललो असं नाहीय. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा जेव्हा होते, तेव्हा त्यांचा प्रशासनावर एक वचक होता, दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही, हे मी अनेकवेळा बोलून दाखवलय” असं रोहित पवार म्हणाले.
“एखादा व्यक्ती स्वत:ची जागा निर्माण करु शकतो. सुनेत्रा काकी स्वत:ची जागा निर्माण करतील हा मला विश्वास आहे. पुण्यात कायदा-सुव्यवस्थेची हालाखीची जी परिस्थिती झालीय त्यावर तो मुद्दा होता. जेव्हा एखादा नेता जातो, तेव्हा त्याच्यामागे पोलीस प्रशासन असतं. त्याला धोका नसतो. पण त्रास सामान्य माणसाला असतो. त्यावर बोललो तर चुकीच काय?” असं रोहित पवार म्हणाले.
तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला पाठिंबा द्या
“पुण्याचे पोलीस आयुक्त भाजपचे नेते सोडले, तर कोणाचचं ऐकत नाहीत. पालकमंत्र्यांचं किती ऐकतात, नाही ऐकत हे त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा. पालकमंत्र्यांना ताकद द्यायची असेल तर अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे अशी भूमिका मी मांडली. आम्ही लोकांच्या बाजूने बोललो. हे पुणेकरांचं मत आहे” असा रोहित पवार यांनी दावा केला. “परिस्थिती तशी वाईट झालेली आहे अशी आमची भूमिका आहे. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, अजितदादांना न्याय देण्यासाठी आंदोलन करा. ती वेळ आलेली आहे. पूणे रिंग रोडला दादांचं नाव देण्यासाठी आंदोलन करा. तुम्ही करत नसाल तर आम्ही करतोय त्याला पाठिबा द्या” असं रोहित पवार म्हणाले.
