Tulsi Vivah: तुळशी विवाहासाठी तुळशीला द्या नवरीचा साज, अवघ्या ८ स्टेप्समध्ये नेसवा सुंदर साडी
तुळशीला साडी नेसवताना ती व्यवस्थित कशी गुंडाळायची आणि पदर कसा सेट करायचा, हे अनेकांना समजत नाही. तुम्हालाही यंदा तुळशी विवाहासाठी तुळशीला सुंदर साडी नेसवायची असेल, तर या सोप्या पद्धतीने तिचा साजशृंगार करू शकता.

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील द्वादशी तिथीला तुळशी माता आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने लावला जातो. या मंगल सोहळ्यासाठी तुळशी वृंदावनाची स्वच्छता करून त्याची आकर्षक सजावट केली जाते. तुळशीच्या रोपाला साडी नेसवून, फुले आणि दागिन्यांनी नवरीप्रमाणे सजवले जाते. मात्र, तुळशीला साडी नेसवताना ती व्यवस्थित कशी गुंडाळायची आणि पदर कसा सेट करायचा, हे अनेकांना समजत नाही. तुम्हालाही यंदा तुळशी विवाहासाठी तुळशीला सुंदर साडी नेसवायची असेल, तर या सोप्या पद्धतीने तिचा साजशृंगार करू शकता.
तुळशीला साडी नेसवण्यासाठी लागणारे साहित्य
यासाठी एक साडी, दोन लाकडी काठ्या, एक मीटर दोरा, साडी पिन आणि एक दुपट्टा लागेल. सजावटीसाठी फुलांचा हार, बांगड्या आणि इतर लहान दागिन्यांचाही वापर करू शकता.
तुळशी वृंदावन तयार करा : सर्वप्रथम एक पाट किंवा चौरंग स्वच्छ करून त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंथरा. त्यावर तुळशीचे रोप ठेवा. आता दोन लाकडी काठ्या एकमेकांना अधिकच्या (+) आकारात बांधून कुंडीत व्यवस्थित उभ्या लावा.
साडीच्या नीऱ्या तयार करा : आता साडीचा पुढील भाग हातात घेऊन त्याच्या एकसारख्या घड्या घाला. या घड्या व्यवस्थित एकत्र करून दोऱ्याच्या मदतीने बांधा, जेणेकरून त्या सुटणार नाहीत.
साडीला घेरदार आकार द्या : तयार केलेल्या घड्या दोऱ्यावर व्यवस्थित पसरवा. साडीचा पुढील भाग लेहेंग्यासारखा दिसेल अशा पद्धतीने त्याचा घेर तयार करा. सर्व घड्या सारख्या आणि नीट दिसतील याची काळजी घ्या.
साडीचा पदर सेट करा : आता साडीचा पदर मागच्या बाजूने पुढे आणा. त्याच्या व्यवस्थित घड्या करून एका लाकडी काठीवर ठेवा. पदर घसरत असल्यास साडी पिनच्या मदतीने तो घट्ट लावा.
दुपट्टा व्यवस्थित लावा : दुपट्टा घेऊन त्याच्या व्यवस्थित घड्या करा. हा दुपट्टा दुसऱ्या लाकडी काठीवर ठेवा. त्यामुळे तुळशीच्या साडीला अधिक सुंदर आणि पारंपरिक लूक मिळेल.
पदर वरच्या बाजूला ठेवा : साडीचा पदर तुळशीच्या रोपाच्या वरच्या फांदीवर व्यवस्थित ठेवा. पदराची रचना सुंदर दिसेल आणि तो खाली घसरणार नाही, याची काळजी घ्या.
हाराने सजावट करा : आता तुळशीच्या वरच्या बाजूला असलेल्या लाकडी काठीवर सुंदर हार किंवा नेकलेस अडकवा. यामुळे तुळशी मातेचा साज अधिक खुलून दिसेल.
बांगड्यांनी शृंगार पूर्ण करा : शेवटी दोन्ही लाकडी काठ्यांवर बांगड्या अडकवून सजावट पूर्ण करा. अशा प्रकारे तुळशीला नवरीसारखा सुंदर साज देता येईल.