घरी गुलाबजाम बनवताना फुटतात? तळताना वापरा ही ट्रिक, होतील बाजारासारखे मऊ
घरी गुलाबजाम बनवताना अनेकदा ते तळताना फुटतात किंवा पाकात टाकल्यानंतर तुटतात. मात्र काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास गुलाबजाम छान मऊ, गोलाकार आणि पाकाने भरलेले बनू शकतात. जाणून घ्या गुलाबजाम तळण्याची योग्य पद्धत.

लहान मुले असो वा मोठे गुलाबजाम हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. सणवार असो किंवा घरी एखादा खास प्रसंग, गुलाबजाम आवर्जून बनवले जातात. अनेक जण घरी बाजारासारखे मऊ आणि रसाळ गुलाबजाम बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधी ते तेलात तळताना फुटतात, तर कधी पाकात टाकल्यानंतर त्यांचा आकार बिघडतो. कधी कधी गुलाबजाम बाहेरून चांगला दिसतो पण आतून कच्चा आणि कडक असतो. त्यामुळे गुलाबजाम बनवताना पीठ मळण्यासोबतच ते योग्य पद्धतीने तळणेही महत्त्वाचे आहे. काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यास गुलाबजाम फुटणार नाहीत आणि छान मऊ होतील. चला तर बाजारासारखे मऊ आणि न फुटता गुलाबजाम बनवण्यासाठी कोणती ट्रिक वापरावी हे जाणून घ्या
तेलाचे तापमान योग्य ठेवा
गुलाबजाम तळण्यासाठी तेल खूप गरम असू नये. तेलाचे तापमान जास्त असल्यास गुलाबजाम बाहेरून लवकर तपकिरी होतात, पण आतून कच्चे राहू शकतात. त्यामुळे तेल मध्यम गरम असताना गुलाबजाम तळायला सुरुवात करावी.
सुरुवातीला कमी गुलाबजाम तळा
एकाच वेळी जास्त गुलाबजाम तेलात टाकू नयेत. सुरुवातीला दोन ते चार गुलाबजाम तेलात सोडावेत. त्यामुळे त्यांना तळताना पुरेशी जागा मिळते आणि ते व्यवस्थित शिजतात.
मंद आचेवर तळा
गुलाबजाम तेलात सोडल्यानंतर गॅसची आच मंद ठेवावी. ते हलक्या हाताने फिरवत राहावेत, जेणेकरून सर्व बाजूंनी सारखा रंग येईल. घाईने मोठ्या आचेवर तळल्यास गुलाबजामचा बाहेरील थर कडक होऊ शकतो.
तळण्यापूर्वी झाकून ठेवा
गुलाबजाम तयार केल्यानंतर लगेच तळणार नसाल, तर ते ओल्या कापडाने झाकून ठेवावेत. त्यामुळे त्यांचा बाहेरील थर कोरडा पडणार नाही. थर कोरडा झाल्यास गुलाबजाम तळताना फुटण्याची शक्यता असते.
गुलाबजामचा रंग लक्षात घ्या
गुलाबजाम तळताना त्यांना हळूहळू सोनेरी तपकिरी रंग येऊ द्यावा. बाहेरून छान रंग आला आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजले, की ते तेलातून बाहेर काढावेत. त्यानंतर कोमट पाकात सोडल्यास ते पाक चांगल्या प्रकारे शोषून घेतात.