
आपल्यापैकी अनेकांचा दिवस हा सकाळी चहा-कॉफी प्यायल्याशिवाय उजाडत नाही. तर काहींना जेवण झाल्यानंतर लगेचच मिठाई किंवा चॉकलेट खाण्याची सवय असते. काहीजण तर संध्याकाळी थंडगार सरबत किंवा कोल्ड्रिंक पित असतात.

पण तुम्हाला माहितीये का, यामुळे तुमच्या दिवसातून किती साखर आपल्या पोटात जाते, याचा अंदाज आपल्यालाही नसतो. गोड खाल्ल्याने आपले मन नक्कीच आनंदी होतं, पण हीच गोडी हळूहळू आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकते.

गरजेपेक्षा जास्त साखर खाल्ल्याने फक्त लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयाचे आजारच होत नाहीत, तर त्वचेवर अकाली सुरकुत्या येऊन तुम्ही वेळेआधीच म्हातारे दिसू लागतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात साखर खाणे गरजेचे असते.

आपण योग्य प्रमाणात साखर खाल्ली तर आपले आरोग्यासाठी सुरक्षित राहते. तसेच जास्त साखर खाल्ल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

मोठ्या माणसांनी दररोज जास्तीत जास्त २५ ग्रॅम म्हणजे साधारण ६ चमचे साखर खाल्ली पाहिजे. यात चहा, कॉफी, चॉकलेट, कोल्ड्रिंक्स, मिठाई यांसारख्या अनेक पदार्थांच्या साखरेचा समावेश असतो.

तर लहान मुलांना दर दिवसातून फक्त ४ चमचे साखर द्यायला हवी. यामुळे त्यांचे दात किडण्याचे प्रमाण कमी होते. लहान मुलांना चॉकलेटऐवजी फळं खायला द्या, जेणेकरुन त्यात नैसर्गिकरित्या असलेली साखर त्यांच्या शरीराला मिळेल.

जर तुम्ही जास्त साखर खात असाल तर तुमचे वजन झपाट्याने वाढते. साखरेतून तुम्हाला पोषण मिळत नाही. तसेच जर तुम्ही सतत साखर खात असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे परिणामी स्वादुपिंडावर ताण येतो. ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका संभवतो.

जास्त साखर खाल्ल्याने हृदयाचे आजार होतात. रक्तदाबही वाढतो. जास्त साखर आपल्या त्वचेतील कोलेजन प्रोटीनला नुकसान पोहोचते, ज्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात. यामुळे तुम्ही कमी वयातच थकलेले दिसू लागता. साखर जास्त प्रमाणात खाल्ल्याने दात किडणे किंवा दातांच्या इतर समस्या होऊ शकतात.

साखर पूर्णपणे सोडणे कठीण असले तरी, तिचे प्रमाण नियंत्रित करणे नक्कीच शक्य आहे. साखरेऐवजी गूळ, मध, खजूर यांसारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करा. तसेच कोल्ड्रिंक्स, मिठाई, कुकीज आणि बेकरीतील वस्तू टाळा. यात मोठ्या प्रमाणात साखर असते.

कोणतीही पॅक केलेली वस्तू विकत घेताना त्यावरचे लेबल वाचायला विसरू नका. यात साखरचे प्रमाण चेक करा. नंतरच ते खा. ताजी फळे खा। कमी साखर असलेले आणि घरी बनवलेले ज्यूस प्या. जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते.