Instant Glow : दिवाळीत चेहऱ्यावर हवा झटपट ग्लो? गव्हाच्या कोंड्यापासून बनवा टू-इन-वन फेसपॅक
Two-In-One Face Pack: दिवाळीत चेहऱ्यावर झटपट ग्लो आणण्यासाठी गव्हाच्या कोंड्यापासून तयार करा हा खास घरगुती फेसपॅक. स्क्रब आणि फेसपॅक असा दुहेरी फायदा देणारा हा उपाय त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसण्यास मदत करू शकतो.

दिवाळीच्या सणात प्रत्येकालाच सुंदर आणि फ्रेश दिसावे असे वाटते. विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील कामं, स्वयंपाक आणि इतर तयारी यामुळे अनेक महिलांना स्वतःच्या त्वचेकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी चेहऱ्यावरील थकवा आणि निस्तेजपणा लपवण्यासाठी अनेक जणी मेकअपचा आधार घेतात. मात्र, मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ आणि नितळ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही घरीच गव्हाच्या कोंड्यापासून टू-इन-वन फेसपॅक तयार करू शकता. हा फेसपॅक स्क्रब आणि फेस पॅक अशा दोन्ही प्रकारे वापरता येतो. मेकअप करण्याच्या साधारण अर्धा तास आधी ही प्रक्रिया केल्यास त्वचा अधिक स्वच्छ आणि तजेलदार दिसण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घ्या कसा बनवायचा आणि वापरायचा हा टू इन वन फेसपॅक
असा तयार करा गव्हाच्या कोंड्याचा फेसपॅक
हा फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीत तीन चमचे गव्हाचा कोंडा घ्या. त्यामध्ये दही, गुलाब जल आणि ग्लिसरीन घालून सर्व साहित्य चांगले एकत्र मिक्स करा. तुमची त्वचा ऑइली असेल तर ग्लिसरीन ऐवजी कच्चे दूध वापरू शकता. तयार मिश्रणाची घट्टसर पेस्ट बनवून घ्या.
चेहऱ्यावर असा करा वापर
फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी माइल्ड फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पेस्टचा थोडासा भाग चेहऱ्यावर लावा आणि बोटांच्या मदतीने हलक्या हाताने स्क्रब करा. स्क्रब करताना चेहऱ्यावर जास्त दाब देऊ नका. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुऊन घ्या.
१५ मिनिटे लावून ठेवा फेसपॅक
स्क्रब केल्यानंतर उरलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि साधारण १५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. या प्रक्रियेमुळे चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यास आणि त्वचा स्वच्छ दिसण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर मेकअप केल्यास तो अधिक नीट दिसण्यास मदत होईल.
टीप: कोणताही फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करायला विसरू नका. जळजळ किंवा खाज जाणवल्यास वापर थांबवा. संवेदनशील किंवा मुरुमांची समस्या असलेल्या त्वचेवर स्क्रबिंग करताना विशेष काळजी घ्या.