चमचमीत अळूची वडी बनवताना ही एक जिन्नस वापराच! कधीच खवखवणार नाही घसा

श्रावणात प्रसिद्ध असलेल्या आळूच्या वड्या आणि भाजींचे आरोग्य फायदे आणि त्यांच्या तयारीतील महत्त्वाचे घटक या लेखात स्पष्ट केले आहेत. अळूच्या पानात भरपूर पोषक तत्वे असतात आणि ते पचनसंस्थेसाठीही फायदेशीर आहेत.

चमचमीत अळूची वडी बनवताना ही एक जिन्नस वापराच! कधीच खवखवणार नाही घसा
alu vadi
| Updated on: Jul 28, 2025 | 4:39 PM

श्रावण महिना सुरु झाला की अनेक पारंपारिक पदार्थांची चव चाखायला मिळते. मसालेभात, अळूची वडी, अळूचं फदफदं, कोथिंबीर वडी, मोदक यांसारखे अनेक पदार्थ प्रत्येक घरात बनवले जातात. महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये अळूवडी किंवा अळूची भाजी याची एक खास ओळख आहे. हे दोन्हीही पदार्थ बनवायला किचकट असले तरी त्याची चव अप्रतिम लागते. त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांसोबतच इतर राज्यातील आणि देशातील लोकांनाही या पदार्थाचे विशेष आकर्षण आहे. पण अनेकदा आपण पाहिलं असेल की अळूच्या पानांचा कोणताही प्रकार बनवताना त्यात चिंच किंवा कोकम घातले जाते, यामागे एक विशिष्ट कारण असते.

अळूचे गुणधर्म काय?

अळूच्या पानांपासून बनवल्या जाणाऱ्या कुरकुरीत आणि चविष्ट वड्या ही अळूची आणखी एक लोकप्रिय रेसिपी आहे. सणावाराला, विशेषतः पावसाळ्यात या वड्या हमखास केल्या जातात. पावसाळ्यात शेतात अळूची पाने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने देवाला नैवेद्य दाखवताना भजी किंवा इतर तळलेल्या पदार्थांसोबत अळूच्या वड्या पानात आवर्जून ठेवल्या जातात.

अळू फक्त चवीलाच चांगला नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतो. यात तुम्हाला अनेक गुणधर्मही मिळतात.

१. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.
२. अळूची पाने व्हिटॅमिन ए, बी आणि सी चा उत्तम स्रोत आहेत.
३. अळूच्या पानांमुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे त्यापासून बनवलेले पदार्थ खावेत, असा सल्ला अनेकदा दिला जातो.
४. पचनासंबंधीचे विकार आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी अळूची भाजी किंवा वड्या खाणे उपयुक्त ठरते.

अळूची भाजी करताना आंबट पदार्थ का वापरतात?

काही लोकांना अळू खाताना घशात खवखवल्यासारखे किंवा खाज सुटल्यासारखे वाटते. याचं कारण अळूच्या पानांमध्ये असलेलं कॅल्शियम ऑक्झिलेट नावाचं तत्व आहे. हे स्फटिक घशाला त्रास देऊ शकतात. यावर उपाय म्हणून, अळूच्या भाजी किंवा वडीमध्ये आंबट पदार्थ वापरले जातात. चिंच, लिंबू किंवा कोकम यांसारख्या आंबट पदार्थांमध्ये ऍसिड असते. हे ऍसिड ‘कॅल्शियम ऑक्झिलेट’ सोबत क्रिया करून ते निष्क्रिय करते, ज्यामुळे घशातील खवखव किंवा खाज कमी होते. याशिवाय, आंबट पदार्थांमुळे अळूच्या भाजी किंवा वडीला एक विशिष्ट रुचकर चव येते. महाराष्ट्रीयन आणि भारतीय घरांमध्ये अळूची भाजी किंवा वडी करताना आंबट पदार्थांचा वापर करण्याची ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे.