Green Tea Side Effects: ग्रीन टीचे फायदे तर ऐकले असतील, पण अतिसेवनाचे हे दुष्परिणाम माहिती आहेत का?

Side Effects of Green Tea: ग्रीन टी वजन कमी करण्यापासून ते आरोग्य चांगले राखण्यापर्यंत अनेक कारणांसाठी प्यायली जाते. मात्र, ग्रीन टीचे अतिसेवन केल्यास आरोग्याला काही नुकसानही होऊ शकते. त्यामुळे रोज ग्रीन टी पिणाऱ्यांनी तिच्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.

Green Tea Side Effects: ग्रीन टीचे फायदे तर ऐकले असतील, पण अतिसेवनाचे हे दुष्परिणाम माहिती आहेत का?
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 4:29 PM

वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी सध्या अनेक जण ग्रीन टीला पसंती देतात. सकाळची सुरुवात ग्रीन टीने करण्यापासून ते दिवसभरात अनेकदा ती पिण्यापर्यंत अनेकांची ही रोजची सवय झाली आहे. ग्रीन टी शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, असे मानले जाते. मात्र, आरोग्यासाठी फायदेशीर समजल्या जाणाऱ्या ग्रीन टीचे अतिसेवन उलट शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. विशेषतः रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्यास पचनाच्या समस्या, लोहाचे शोषण कमी होणे आणि कॅफिनशी संबंधित त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे ग्रीन टी पिण्यापूर्वी तिचे संभाव्य दुष्परिणाम जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

लोहाची कमतरता आणि अॅनिमियाचा धोका

Loading...

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे घटक असतात. हे घटक अन्नातून मिळणाऱ्या लोहाचे शरीरात शोषण होण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतात. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर लगेच ग्रीन टी पिणे टाळावे. विशेषतः ज्यांच्या शरीरात आधीच लोहाची कमतरता आहे, त्यांनी याबाबत अधिक काळजी घ्यावी. आहारात लोह आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करणेही महत्त्वाचे आहे.

उपवासात ग्रीन टी पिणे ठरू शकते त्रासदायक

काही लोक उपवासाच्या वेळी ग्रीन टी पिणे पसंत करतात. मात्र, रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने काही लोकांना पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. यामध्ये मळमळ, उलट्या आणि बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांचा समावेश होतो. त्यामुळे उपवासात किंवा सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिताना काळजी घ्यावी.

कॅफिनचे प्रमाण वाढू शकते

ग्रीन टीमध्ये कॅफिन असते. त्यामुळे दिवसातून अनेक कप ग्रीन टी प्यायल्यास शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढू शकते. याचा परिणाम झोपेवर आणि मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. काही लोकांना अस्वस्थता, चिंता, चिडचिड किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी घ्यावी काळजी

गर्भवती महिलांनी ग्रीन टीचे अतिसेवन टाळावे. ग्रीन टीमधील कॅफिनचे जास्त प्रमाण गर्भधारणेदरम्यान त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी दिवसातून किती ग्रीन टी प्यावी, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रीन टीमधील कॅफिन आईच्या दुधातून बाळाच्या शरीरात जाऊ शकते. त्यामुळे बाळाच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us