
मुंबई : प्रत्येक कारचालक त्याच्या कारची जीवापेक्षाही जास्त काळजी घेत असतो. मग कार चालवताना तिला स्क्रॅच पडू नये किंवा आणखी काही बिघाड होऊ नये याची मालक काळजी घेत असतो. तसेच बहुतेक लोक त्यांच्या कारमधील अनेक प्रकारची दुरुस्ती करण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असतात. पण आता आपण एका अशा ट्रिक बाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि तुमच्या कारची निघालेली दुरुस्ती तुम्ही स्वतःच दूर करू शकाल. ही कारची दुरुस्ती तुम्ही एका साबणाच्या मदतीने करू शकता. हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल पण हे खरं आहे. तर आता आपण साबण कारमध्ये येणारा बिघाड कशा पद्धतीने दूर करू शकतो याबाबत जाणून घेणार आहोत.
बहुतेक लोकांच्या कारचा दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज येतो. तर हा आवाज बंद करायचा असेल तर तुम्ही साबणाचा वापर करू शकता. साबणाच्या मदतीने तुम्ही दरवाजाचा येणारा आवाज थांबवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या कारच्या दाराच्या बोल्टवर साबण चोळा त्यामुळे दरवाजातून येणारा आवाज थांबण्यास मदत होईल.
कार धुतल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजूच्या आरशांवर पाणी साचते. बाजूच्या आरशांवर पाणी साचल्यामुळे मागचं दिसणं कठीण होतं. त्यामुळे त्या आरशांवरील पाणी पुन्हा पुन्हा पुसत राहावं लागतं. अशावेळी जर तुम्हाला साचलेलं पाणी घालवायचं असेल तर आरशावर साबणाचा बार चोळा. आरशांवरती साबण चोळल्यामुळे त्यावरती पाणी साचत नाही.
जर कार स्वच्छ धुतली नाही किंवा ती स्वच्छ ठेवली नाही किंवा बाहेरचे पदार्थ कारमध्ये बसून खाल्ले तर कारमधून विचित्र वास येऊ लागतो. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या कारमध्ये फ्रेशनरचा वापर करतात. पण काही लोकांना फ्रेशनरच्या सुगंधाची एलर्जी असते. तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कारमध्ये सुगंधित साबणाचा वापर करू शकता, यामुळे तुमच्या कारमधील दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होईल.
कारचे विंडशील्ड नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. कारण विंडशील्ड स्वच्छ ठेवल्यामुळे पुढचा रस्ता स्पष्टपणे दिसण्यास मदत होते. पण काही वेळा ते इतके घाण होते की काही केल्या ते साफ होत नाही. मग तुम्ही बाहेरून विंडशील्ड साफ करून आणता. पण जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही साबण घासून विंडशील्ड पेपरने स्वच्छ करू शकता. तसेच साबण घासल्यानंतर गरजेनुसार पाण्याचा देखील वापर करा.