
पंजाब म्हटलं की डोळ्यासमोर मोहरीची शेते, गिद्दा आणि भांगडा नृत्य उभं राहतं. पण पंजाब म्हणजे फक्त इतकंच नाही. पंजाब हे इतिहास, संस्कृती, धर्म आणि निसर्गाचे एक अद्भुत मिश्रण आहे. या राज्याच्या सौंदर्यामुळे इथे एकदा आलेला माणूस पुन्हा-पुन्हा येण्याची इच्छा ठेवतो. तर आज आपण पंजाबमधील अशा 8 ठिकाणांबद्दल जाणून घेऊया, जिथे फिरण्यासाठी परदेशी पर्यटकही आतुर असतात.
1. सुवर्ण मंदिर, अमृतसर (Golden Temple, Amritsar)
सुवर्ण मंदिर हे केवळ शिखांचे प्रमुख तीर्थस्थळ नाही, तर जगातील सर्वात शांत आणि आध्यात्मिक ठिकाणांपैकी एक आहे. येथील पवित्र सरोवर, संगमरवरी वास्तुकला आणि २४ तास चालणारे लंगर (मोफत भोजन) जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.
2. वाघा बॉर्डर, अमृतसर (Wagah Border, Amritsar)
भारत-पाकिस्तान सीमेवर होणारी ‘बीटिंग रिट्रीट सेरेमनी’ एक रोमांचकारी अनुभव आहे. देशभक्तीचा जोश, गर्दी आणि सैनिकांची गर्वाने भरलेली चाल परदेशी पर्यटकांनाही भारावून टाकते.
3. आनंदपूर साहिब (Anandpur Sahib)
पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यात असलेले हे ठिकाण शिख धर्माचे जन्मस्थान मानले जाते. तख्त श्री केसगढ साहिब आणि वार्षिक ‘होला मोहल्ला’ सण इथे खूप प्रसिद्ध आहे. इथे होणारे घोडेस्वारी आणि मार्शल आर्टचे थेट प्रदर्शन परदेशी पर्यटकांना आकर्षित करते.
4. पटियाला (Patiala)
पटियालाची राजेशाही परंपरा, रंगीत बाजार आणि संगीताची परंपरा पर्यटकांना वेगळा अनुभव देतात. इथला किला मुबारक आणि बरदारी गार्डन पाहण्यासारखे आहेत. पटियाला सूट आणि पटियाला पेगसारखे शब्द इथूनच लोकप्रिय झाले आहेत.
5. रूपनगर (Rupnagar)
या शहराला आधी ‘रोपड’ म्हणून ओळखले जायचे. हे शहर सिंधू संस्कृतीचे (Indus Valley Civilization) एक महत्त्वाचे केंद्र आहे. इथलं रोपड पुरातत्व संग्रहालय आणि सतलज नदीचा किनारा पक्षीप्रेमींसाठी स्वर्ग मानला जातो.
6. जलियानवाला बाग, अमृतसर (Jallianwala Bagh, Amritsar)
1919 सालच्या भीषण हत्याकांडाची आठवण करून देणारी ही जागा आहे. इथल्या भिंतीवर आजही गोळ्यांच्या खुणा पाहायला मिळतात. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा संघर्ष आणि भावना अनुभवण्यासाठी परदेशी पर्यटक इथे नक्की भेट देतात.
7. कपूरथला (Kapurthala)
कपूरथला त्याच्या फ्रेंच वास्तुकलेसाठी आणि राजेशाही इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. जगजीत पॅलेस आणि एलिसी पॅलेस ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. युरोपियन शैलीतील राजवाड्यांमुळे याला ‘पंजाबचे पॅरिस’ असेही म्हणतात.
8. फतेहगड साहिब (Fatehgarh Sahib)
गुरु गोबिंद सिंग यांच्या मुलांनी बलिदान दिलेल्या ठिकाणांपैकी हे एक आहे. येथील गुरुद्वारा फतेहगड साहिब हे केवळ शिखांसाठीच नाही, तर प्रत्येक संवेदनशील व्यक्तीसाठी एक भावनिक स्थान आहे.