परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT वा EDP या कोडवर्डचा अर्थ काय ? उन्हाळ्यात कोणते परफ्युम बेस्ट ?
परफ्यूम अनेकांना आवडतो. परंतू तो खरेदी करताना बाटलीवर EDC, EDT वा EDP असे कोडवर्ड लिहिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला योग्य परफ्युम निवडता येतो.

बाजारात अनेक प्रकारचे परफ्यूम असतात. काहींचा सुंगध मंद असतो, तरी काही उग्र असतात. परफ्युम खरेदी करताना बाटलीवर छोट्या अक्षरात EDC, EDT वा EDP असे इंग्रजीत लिहिलेले असते. या शब्दांकडे अनेक लोक लक्ष देत नाहीत. अनेकांना याचा अर्थ माहिती नसतो. परंतू तुम्हाला नेमका कोणता परफ्युम हवा आहे याची माहीती या कोडमध्ये दडलेली असते. त्यामुळे परफ्युम खरेदी करण्या आधी या कोडचा अर्थ माहिती करुन घ्या मगच तुम्हाला योग्य निवड करता येईल.
परफ्युमच्या बाटलीवर ही छोट्या अक्षरात लिहिलेली माहिती महत्वाची असते. त्यामध्ये बाटलीत परफ्युम ऑईलच्या कॉन्सनट्रेशन किती आहे हे सांगितलेले असते. चला तर नेमके या कोडवर्डमध्ये काय माहिती असते ते पाहूयात.त्यामुळे तुम्हाला योग्य परफ्युम खरेदी करण्यास ही माहिती महत्वाची ठरणार आहे. पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा परफ्युम खरेदी करायला जाल तेव्हा कन्फ्युज होणार नाहीत आणि योग्य परफ्युमची निवड करु शकाल.
Eau de Cologne (EDC)
ई-डी-कोलोन (EDC) परफ्यूमच्या श्रेणीत सर्वात हलका पर्याय आहे. यात परफ्युम ऑईलचे प्रमाण केवळ २ ते ४ टक्के असते. उर्वरित भाग अल्कोहल आणि पाण्याचा असतो. परफ्युम ऑईल कमी असल्याने याचा सुगंध लागलीच उडून जातो. मुश्कीलीने एक ते दोन तास याचा सुगंध टिकतो. या परफ्युममध्ये सिट्रस वा हर्ब्स सारखे टॉप नोट्सचा वापर केलेला असतो. यामुळे हा परफ्युम तात्पुरता फ्रेश वाटण्यासाठी चांगला पर्याय आहे. मात्र संपूर्ण दिवसासाठी हा पर्याय योग्य नाही.
Eau de Toilette (EDT)
बाजारात मिळणारे बहुतांशी परफ्युम या श्रेणीतील असतात. यात परफ्युम ऑईलचे प्रमाण ५ ते १५ टक्क्यांच्या दरम्यान असते. हे परफ्युम ऑईल बऱ्यापैकी जास्त असल्याने याचा सुगंध ३ ते ५ तास टिकून रहातो. यामुळे हा परफ्युम सर्वाधिक पसंद केला जातो. कारण हा जास्त हलका ना एकदम उग्र असतो, मध्यम स्वरुपाचा असतो. ऑफीस वा डे आऊटसाठी हा परफ्युम बेस्ट आहे.
Eau de Parfum (EDP)
ई-डी-परफ्यूम (EDP) या परफ्यूम ऑईलचे कॉन्सनट्रेशन खूप जास्त असते. सुमारे १५ ते २० टक्क्यांच्या आसपास असते. त्यामुळे या परफ्युमचा सुगंध ५ ते ८ तास किंवा त्याहून जास्त तास टिकून राहू शकतो. यात बेस नोट्स, उदा. लाकूड वा कस्तूरीची सुगंध जास्त असतो. हा परफ्युम सायंकाळच्या पार्टी वा हिवाळ्याच्या मोसमासाठी ठिक आहे.
उन्हाळ्यात कोणता परफ्युम बेस्ट ?
तुम्हाला वाटत असेल की उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्याने घामाच्या दुर्गंधी पासून सुटकारा मिळवण्यासाठी दीर्घकाळ चालणारा EDP सर्वात बेस्ट आहे. तर तुम्ही चुकीचे आहात.तापमान वाढल्यानंतर परफ्युम ऑईल लवकर उडून जाते. त्यामुळे परफ्युमचा अचानक उग्र वास येऊ लागतो. त्यामुळे उन्हात जास्त गरम होत असेल तर EDT हा सर्वात चांगला पर्याय आहे. याचा सुगंध रिफ्रेशिंग असतो आणि उन्हाळ्यात हा बेस्ट आहे