
‘ती पाहतांच बाला, कलिजा खलास झाला, छातींत इष्कभाला, कीं आरपार गेला !’ असे आचार्य अत्रे यांचे एक गीत अजरामर आहे. परंतू पहिल्या नजरेतलं प्रेम खरोखरच असते का ? अनेक कविता, शेरो- शायरीत पहिल्या नजरेतल्या प्रेमाबद्दल लिहिलेले आहे. अखेर पहिल्या नजरेत कोणाला पाहून माणसाला प्रेम कसे काय होऊ शकते.? म्हणजे प्रेमाची सुरुवात डोळ्यापासूनच होते की काय ? काय आहे या मागचे विज्ञान हे आपण आज पाहूयात…. अनेक संशोधकांचे म्हणणे आहे की जेव्हा आपण एखाद्याला पाहातो तेव्हा ती व्यक्ती पाहून शरीरातून ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होत असतो. हे हार्मोन मानवी मेंदूत आणि शरीरात भावनात्मक आणि सामाजिक संबंध तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे या हार्मोन्सला ‘लव्ह हार्मोन’ किंवा कडल हार्मोन्स देखील म्हटले जाते. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाहाता आणि तुम्हाला चांगले वाटते तेव्हा शरीरातून ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होते. ...