
दारू पिल्यामुळे शरीराचे मोठे नुकसान होते, मात्र तरीही जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील लोक मोठ्या प्रमाणात दारुचे सेवन करतात. मात्र दारुचे अतिसेवन केल्यास अनेकांना झिंग चढते. अनेकांचा आपल्या शरीरावरील ताबा सुटतो. त्यामुळे ते चालताना पडतात, काहीही बडबड करतात. त्यांना स्वतःच्या शरीराचाही भान राहत नाही आणि विचार करण्याची क्षमता देखील कमी होते. मात्र तुम्ही कधी असा विचार केला आहे का की दारू पिल्यानंतर मेंदूमध्ये असे काय घडते की माणूस स्वतःवरचा ताबा गमावतो? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अब्यूज अँड अल्कोहोलिझमने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, दारू थेट मेंदूच्या कम्युनिकेशन पाथवे मध्ये हस्तक्षेप करते. अल्कोहोलमुळे मेंदूच्या कार्यावर आणि त्याच्या रचनेवरही परिणाम करते. जेव्हा दारू रक्ताद्वारे मेंदूपर्यंत पोहोचते, तेव्हा ती न्यूरॉन्स (म्हणजे संदेश देणाऱ्या पेशी) यांच्यातील संवाद मंदावते. त्यामुळे दारू पिल्यानंतर व्यक्तीला स्पष्टपणे विचार करता येत नाही आणि त्याच्या शरीरावरील नियंत्रणही गमावले जाते. यामुळे मूड आणि वर्तनातही अचानक बदल होतात.
दारू पिल्याने फक्त मेंदूवर परिणाम होतो असं नाही तर दारू पेरिफेरल नर्व्हस सिस्टीमलाही नुकसान पोहोचवते. जास्त प्रमाणात दारू पिणाऱ्या लोकांमध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी नावाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे हात-पायांमध्ये मुंग्या येणे किंवा जळजळ जाणवते. यामुळे नसांच्या होणाऱ्या या नुकासानामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, तसेच अचानक उभे राहिल्यावर रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे जर नसांचे जाळे कमकुवत झाले तर शरीराची संवेदनशीलता कमी होते. याच कारणामुळे दारू पिल्यानंतर लोक तोल गमावतात.
महत्त्वाची बाब म्हणजे, दारू पिल्यामुळे शरीराच्या एंडोक्राइन सिस्टीमही बिघडते. यामुळे शरीरातील स्थिरता आणि आरोग्य राखणाऱ्या हार्मोन्सना बाधित करते. यामुळे थायरॉईडचे विकार, असामान्य कोलेस्ट्रॉल पातळी आणि तणाव सहन करण्याची क्षमता कमी होणे हे परिणाम जाणवतात. संशोधनानुसार, दारू तरुणांमध्ये प्यूबर्टीची प्रक्रिया मंदावू शकते किंवा उशिरा सुरू होऊ शकते, यामुळे शरीराच्या नैसर्गिक विकासाला धोका निर्माण होतो. त्यामुळे दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो.