महाराष्ट्र दिनी – परेवर विरार ते डहाणू पंधरा डबा लोकल सुरु, मात्र, मराठी भाषेला डावलल्याने नाराजी

पश्चिम रेल्वेवर विरार ते डहाणू रोड मार्गावर इतक्या वर्षानंतर प्रथमच १५ डब्यांची लोकल १ मे, महाराष्ट्र दिनापासून सुरु करण्यात आली आहे. मात्र, या लोकलला हिंदी भाषेत पाठी लिहील्याने प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र दिनी - परेवर विरार ते डहाणू पंधरा डबा लोकल सुरु, मात्र, मराठी भाषेला डावलल्याने नाराजी
15-Coach Local Train Introduced in the Virar-Dahanu Section
| Updated on: May 01, 2026 | 7:38 PM

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणू दरम्यान महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १५ डब्यांची लोकल सुरु करण्यात आली आहे. या १५ डब्याच्या लोकलमुळे या मार्गावरील लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या या १५ डब्याच्या लोकलच्या स्वागताचा फलक मात्र पश्चिम रेल्वेने हिंदी भाषेत लिहिल्याने डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चर्चगेट ते डहाणू मार्गावर १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढण्याची देखील मागणी होत आहे.

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू मार्गावर पंधरा डब्यांच्या लोकलचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या सात स्थानकातील प्रवाशांचा फायदा होणार आहे. मात्र, या पंधरा डब्याच्या लोकलचा शुभारंभ १ मे ‘महाराष्ट्र दिना’ पासून सुरु करण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील मराठी भाषेचा मात्र पश्चिम रेल्वे प्रशासनाने विसर पडल्याचे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने म्हटले आहे. या संदर्भात या प्रवासी संघटनेने एक्सवर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे.

येथे पोस्ट पाहा –

१५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या २२७ वरुन २४४ वर

पश्चिम रेल्वेवरील सध्याच्या वेळापत्रकातील १७ बारा डब्यांच्या लोकल फेऱ्या १ मेपासून १५ डब्यांच्या म्हणून चालवण्यात येणार आहेत. तसेच १२ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. या १५ डब्यांच्या १७ नव्या फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील पंधरा डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या आता २२७ वरुन २४४ वर गेली आहे. यातील आठ पंधरा डबा लोकल फेऱ्या प्रथमच विरार आणि डहाणू स्थानकादरम्यान सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे या १५ डब्यांच्या लोकलना ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाईन्स या स्थानकांवर दोन्ही दिशांना थांबा मिळणार नाही. त्याऐवजी, दादर स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर त्यांना दोनदा हॉल्ट देण्यात येणार आहे.

या सोबत १२ अतिरिक्त १२ डब्यांच्या एसी लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसी लोकलची संख्या १३३ वरुन १४५ इतकी झाली आहे. तर विकेण्डच्या एसी लोकलच्या फेऱ्या १०६ वरुन ११८ झाल्या आहेत.

Follow Us