शिवसेना ठाकरे गटाला खिंडार? महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी

मोठी बातमी समोर येत आहे, ऐन महापालिका निवडणुकीपूर्वीच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना ठाकरे गटाला खिंडार? महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2025 | 8:25 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये महविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवरांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. राज्यात तब्बल 232 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं होतं.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. दरम्यान आता ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसणार आहे.

सुधाकर बडगुजर यांच्यासह 15 हुन अधिक माजी नगरसेवक मंगळवारी  भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान सुधाकर बडगुजर यांची यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र नाशिकच्या स्थानिक नेतृत्वाकडून बडगुजर यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाला विरोध होता, परंतु आता हा विरोध मावळला असून, सुधाकर बडगुजर हे उद्या 15 हून अधिक माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यासह बबन घोलप हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार पूर्वी भाजपचे पदाधिकारी असलेले मात्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेले  गणेश गीते हे देखील पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का  

दरम्यान शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात महात्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होत आहेत, यामध्ये नाशिक महापालिकेचा देखील समावेश आहे. यापूर्वीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.