पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे गेला 19 वर्षीय मुलाचा जीव, वृद्ध वडिलांवर दुःखाचा डोंगर..

काळाचाैकी येथील महागणपती येथे धक्कादायक घटना घडली. त्यानंतर जोगेश्वरीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालिकेच्या गलथान कारभारामुळे एका 19 वर्षीय तरुणाचा जीव गेला. ज्याने एकच खळबळ उडाली.

पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे गेला 19 वर्षीय मुलाचा जीव, वृद्ध वडिलांवर दुःखाचा डोंगर..
Mumbai
| Updated on: Sep 20, 2026 | 12:32 PM

जोगेश्वरीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  पालिकेच्या गलथान कारभारामुळे एका 19 वर्षीय तरुणाचा जीव गेला. ज्याने एकच खळबळ उडाली. जोगेश्वरी पूर्व गणेश विसर्जनादरम्यान विद्युत प्रवाह उतरून रोहित भीमसिंग राठोड या 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विसर्जन स्थळावरील पाण्याच्या डबक्यात यंत्रणेत अचानक करंट आला आणि रोहित गंभीररीत्या होरपळला. त्याला तात्काळ ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पालिकेच्या चुकीमुळे रोहितला आपला जीव गमवावा लागला. रोहित हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, आईचे छत्र आधीच हरपले होते आणि आता एकुलत्या मुलाच्या जाण्याने वृद्ध वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेनंतर नातेवाईकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. विसर्जन बंद होते किंवा तिथे धोका होता तर आतमध्ये जाण्याची परवानगी कशी दिली, तिथे ना पालिकेचे अधिकारी होते ना सुरक्षेचे नियम पाळले गेले, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. पालिकेवर नातेवाईकांकडून गंभीर आरोप ही केली जात आहेत.

दुसरीकडे मुंबईच्या काळाचौकी परिसरात महागणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या यादव कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. बिहारमधून मुंबईत आलेल्या चिमुकल्या रागिनी यादव हिला लालबागच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याचा हट्ट केला होता. दर्शन घेऊन पुन्हा गावी जायचं, अशी तिची इच्छा होती. मात्र, काळाचौकीतील महागणपतीच्या दर्शनादरम्यान घडलेल्या दुर्घटनेने यादव कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

बिहारमधून यादव कुटुंब मुंबईत आपल्या मावशीच्या घरी, मानखुर्द येथे आले होते. यावेळी चिमुकली रागिनी यादव हिने गणपती बाप्पाच्या दर्शनाचा हट्ट केला. मला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी पुन्हा गावी जाईन, असं रागिनीने सांगितलं होतं. रागिनीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिची मावशी किस्मती यादव तिला काळाचौकीतील महागणपतीच्या दर्शनासाठी घेऊन गेल्या.

परिसरात मोठी गर्दी असल्याने रागिनी आणि तिची मावशी एका दुकानाच्या बाजूला असलेल्या आडोशाला थांबल्या.
अचानक विद्युत रोषणाईमधून शॉक लागल्याने पाच जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच रागिनीचे वडील घनश्याम यादव यांनी खोपोली येथे आपला ट्रक पार्क केला आणि तातडीने रुग्णालय गाठलं. घनश्याम यादव हे ट्रक चालक असून त्यांच्या कुटुंबात तीन मुली आणि एक मुलगा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us