Devendra Fadnavis : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचं आवाहन, सूचना

"महाराष्ट्र आज देशात पायाभूत सुविधा निर्माणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. सध्या मुंबई, पुणे, नागपूर 173 किमी लांबीचा मेट्रो मार्ग कार्यरत आहे. दरवर्षी 50 किमी मेट्रो मार्ग सेवेत येईल असं नियोजन केलं आहे. प्रत्येक माणसाचं जीवन उंचावणं हा विकासामागचा उद्देश असल्याच त्यांनी सांगितलं"

Devendra Fadnavis : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाचं आवाहन, सूचना
Devendra fadnavis
| Updated on: May 01, 2026 | 9:58 AM

“गेल्यावर्षी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला 65 वर्ष पूर्ण झाली होती. यंदाचा महाराष्ट्र दिन विशेष आहे. हे वर्ष समता, सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरा करत आहोत. महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही. हा आत्मपरिक्षणाचाही दिवस आहे. विकासाच्या वाटेवर आपण कुठे होतो, कुठे आहोत अजून किती पल्ला गाठायचा आहे याचं राज्य म्हणून आत्मपरिक्षण करण्याचा दिवस आहे” असं महाराष्ट्र दिनी जनतेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मी आज संवाद साधत असताना जग आज कठिण वळणावर उभं आहे. आखाती देशात युद्ध सुरु आहे. त्या संघर्षाची झळ जगाला बसत आहे. पण त्याचवेळी आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने ऊर्जा सुरक्षेसाठी, पर्यायी तेल स्त्रोतांसाठी, सौर ऊर्जा विस्तारासाठी उभारलेल्या कामांमुळे जगातल्या अन्य देशांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतय, तशी भारतात परिस्थिती झालेली नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“जगात कितीही आव्हान असताना महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र देशाच्या जीडीपीत जवळपास 14 टक्के योगदान देत आहे. 2024-25 मध्ये महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित केली. हे प्रमाण देशात आलेल्या परकीय गुंतवणूकीच्या 39 टक्के आहे. डावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. त्यातून 40 लाख रोजगार निर्माण होणार आहेत” असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. “जगात आर्थिक समस्या असताना देखील महाराष्ट्राने जगातील 30 वी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली. हेच आपल्या राज्याचे सामर्थ्य आहे. हा विकास समतोल असावा. गडचिरोली, नंदूरबार, धुळे हे जिल्हे सुद्धा गुंतवणूकीच्या नकाशावर आले आहेत” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना काय आवाहन केलं?

“यावर्षी एलनिनोच्या परिस्थितीमुळे 2026 च्या हंगामात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आपला खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. म्हणून हा अंदाज गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पेरणीची घाई करु नका. कृषी विभागाकडून येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्या. त्यामुळे या संकटापासून बचाव करणं सोपं जाईल” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “मला शेतकरी बांधवाला आश्वसत करायचं आहे की, सरकार म्हणून आम्ही आधीपासून पाणी, चारा याचं नियोजन प्रारंभ केलं आहे. जलयुक्त शिवार, गाळयुक्त शिवार या कामांना गती देण्यास प्राधान्याने निधी देण्यास सांगितलं आहे. ठिबक सिंचन, तृषार सिंचन यांचा जास्तीत जास्त वापर करा. पाण्याची बचत हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्यात खतं, बियाणांची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करत आहोत. राज्य सरकार आपल्यासोबत आहे” असं सांगून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

“कितीही नैसर्गिक संकटं आली तरी महाराष्ट्राचा विकास रथ थांबणार नाही. विकसित महाराष्ट्राचा आराखडा आपण तयार केला आहे. 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी आत्तापासून कामाला सुरुवात केली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us